Friday, February 26, 2010

बजेट, तज्ज्ञ आणि सदामा

प्रसंग क्रमांक एक:

पॉश (म्हणजे टीव्हीवर तरी...) दिसणाऱया केबिनमध्ये चर्चा सुरूय.
बजेटची. बजेट २०१० असं काहीतरी सारखं इकडून तिकडं धावतंय. टीव्हीवर चर्चा चाललीय. तज्ज्ञ आणि अँकरमध्ये. विषय अर्थातच बजेट आणि मी अर्थातच एक प्रेक्षक.

'तर सर, मला असं वाटतं, की यावर्षीच्या बजेटमध्ये फिस्कल डिफिशिएटवर जास्त प्रोग्रेस आहे. नाही का?'

'येस सुनील. इव्हन आय थिंक की एकाचवेळी छान बॅलन्स साधताहेत फायनान्स मिनिस्टर. फिस्कल डिफिशिएटवर आणि फार्मर्स म्हणजे रूरल इंडियावरही त्यांचं लक्ष आहे. त्यासाठी ते स्ट्रॉंग एफर्टस् घेताहेत.'

'सर, रुरल इंडियाचा विषय निघालाच आहे, तर फार्मर्स आणि रुरल इंडियासाठी बजेटमध्ये काय आहे, असं तुम्हाला वाटतं?'

'लूक सुनील. इंडिया इज् अ रुरल कंट्री. म्हणजे आपण डेव्हलपिंग आहोत. रुरल इंडियासाठीच तर सगळ्यात जास्त फ्रॅक्शन जातो बजेटचा. फार्मर्ससाठी चांगली लोन्स मिळणाराहेत नं आता. म्हणजे तसंच तर म्हटलय फायनान्स मिनिस्टरनी. खूप काही आहे बजेटमध्ये...'

रटाळ चर्चा. काहीच न समजू देणारी. बजेटमध्ये माझ्यासाठी काय, हे मला काहीच समजलं नाही. माझ्या गावाला काय फायदा, हेही काही कळालं नाही. मरू दे ते बजेट. निवांत पारावर बसू. दुपारच्या गारव्याला म्हणून येऊन पारावर निवांत विसावलोय.

तोच...
-----------------------------
प्रसंग दुसरा:

'बज्येट फुटलं गां...लई वंगाळ झालंया. ह्या ब्येण्यांनं लईच चाट दिलीया...'

सदामा किंचाळत सुटला, आणि छातीत धस्सं झालं. वाटलं, की कोणाच्या तरी डोक्यावर काहीतरी फुटलंय आणि गावात गोंधळ झालाय. सदामा धापा टाकत आला. पारावर बसला. मी हुशार (आमच्या गावात). त्यामुळं मला सगळं माहिती असणारच या खात्रीनं त्यानं गाडी सुसाट सोडली.

'दादू, आरं ह्या ब्येण्यांनी घोर केला. शेताची माती व्हणार. त्ये ब्येणं म्हणतंया जा बँकात आन् काढ कर्ज. आरं बा, पर फ्येडू कसं ते? हितं शेतात पिरवाया खत न्हायी. खत करणाराय आन्नी म्हाग. मग पेरू काय, पिकवू काय आन् विकू काय? कर्ज न्हाय काढलं, तर जगणार कसं? तरंच ते ब्येणं म्हणतया कर्ज काढ. याच्या बाच्या पोराच्या बँका हायती का?'

सदामा जाम कातावलेला...मी जाम धास्तावलेलो. मला जे बजेट कळलं नाही, ते सदामाला कळलेलं पाहून.
-----------------------------
दोन प्रसंग. आणि मला बसले दोन धक्के.

धक्का क्रमांक १ - सदामाला बजेट बिजेट कसं काय कळलं?
धक्का क्रमांक २ - सदामानं जे काही विश्लेषण केलं, ते त्या तज्ज्ञांना कसं नाही समजलं?

Thursday, February 25, 2010

इंग्रजीतले भारतीय शब्द...

इंग्रजी ही जगाची भाषा आहे. आपण नाकारलं, तरीही तिचं महत्व काही कमी होत नाही. इंग्रजी का वाढली, याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे या भाषेनं तंत्रज्ञान आणि विज्ञान आत्मसात केलं. सामान्यांपर्यंत सामान्यांच्या भाषेत पोहोचवलं. आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे या भाषेनं अन्य भाषांचा दुस्वास न करता त्यांच्यातील शब्द आपल्या भाषेत आणले. लोक बोलतात ती भाषा, हे सूत्र सांभाळले.

हिंदी/उर्दू - बंगला, करोड, डाकू, देवदार, डोंगी (लहान होडकं), दुंगारी (विजार), घी, जिमखाना, जोधपुरी, लाख, लूट, पैसा, पकोडा, राज, सामोसा, शाम्पू, तंदूरी, टमटम, वाला.
मल्याळी - बेटल, कॉयर, कोप्रा, जिंजर, टीक
मराठी - मुंगूस
संस्कृत - आश्रम, अवतार, बनिया, बनियन, बेरील्, ब्राम्हण, कार्माइन, चित्ता, शिन्त्झ, चटणी, क्रिमसन्, जगर्नॉट, जंगल, ज्युट, लॅक्वर, मॅडरीन, पंडित, पालखी, सफायर, सुट्टी, सुगर (शुगर), अहिंसा, आश्रमा, आत्मा, बोधीसत्व, बुद्ध, चक्र, गुरू, हटयोग, कर्म, लिंग, महाराज, महात्मा, मंत्र, माया, निर्वाण, राजा, राणी, सत्याग्रह, सूत्र, स्वस्तिक, यंत्र, योग, योगासन
तमिळ - कॅटामारन्, चिरूट, करी, मॅंगो, मुल्लीगटावनी (mulligatawny), पॅरीह् (pariah)
तेलुगू - बंडिकोट

ही सहज मिळालेली माहिती. कदाचित आणखीही मराठी, संस्कृत शब्द इंग्रजीत रुळलेले असू शकतील. वर दिलेले शब्द ऑक्सफर्डच्या वेबसाईटवरून घेतलेले आहेत. एखादी भाषा कशी विकसित होत जाते, याचं हे उदाहरण मानता येईल. इंग्रजांनी ज्या ज्या देशांवर राज्य केले, तेथील शब्द इंग्रजीत घेतले आहेत.

परवा गुगल बझ् लॉन्च झालं. बझ् हा शब्द अर्थवाही आहेच. गुणगुण हा त्याला पर्यायी शब्द असू शकेल. तो तितकासा लागू होईल का? की बझ् स्विकाराचा?

मराठी वाढवायची असेल, तर प्रत्येक मराठी शब्दाला पर्यायी शब्द तयार करण्यात वेळ घालवायचा, की शब्दांचे मराठीकरण करून ते वापरायचे, हा निर्णय आपल्या हातात आहे.

(चपाती हा शब्दही ऑक्सफर्डमध्ये आहे. पण, वेबसाईटवरील माहितीत त्याचा समावेश झालेला नाही. म्हणून तो घेतलेला नाही.)

Tuesday, February 23, 2010

कंपनी आणि 'कंपनी'...

संध्याकाळी मुलाला मांडीवर घेऊन गप्पा मारत बसलो होतो. त्याचं वय पाच. त्याला गप्पा मारायला आवडतात. जगातल्या कुठल्याही विषयावर. मी त्याला 'लांबड लावणं' म्हणतो. असो.
गप्पांच्या ओघात विषय निघाला मी रोज घरी उशीरा येण्याचा.
त्याचं म्हणणं, तु असा गप्पा मारताना मला खूप आवडतोस.
माझं म्हणणं, असं रोज संध्याकाळी गप्पा मारायला येणं मला कसं शक्य आहे ?
तो, 'का नाही?'
मी, 'अरे, ऑफिस नसतं का?'
तो, 'ऑफिस आईलाही असतं...'
मी, 'अरे, मला काम जास्त असतं...'
तो, 'असू दे, लवकर का येत नाहीस...?'

विषय असा रंगत गेला होता. मग, मी त्याला विचारलं, तुला इतकं कळतं, तर मला सांग मी ऑफिसातून लवकर कसा येऊ शकतो रे रोज?

त्यानं दिलेलं उत्तर मनात ठसलंय.

'ऑफिसमध्ये लवकर जात जा. वेळेवर. मी कसा स्कूलला वेळेवर जातो?, तसं वेळेवर जात जा. मी कसं टीचर सांगतील, तसं पटपट करतो, तसं तू तुझ्या टीचर सांगतील, ते पटपट करत जा. कामं पटपट संपव. मी कधी स्कूलमधून येताना स्कूलबस चुकवतो का रे? स्कूल सुटली की मी बसमध्ये बसतो. लगेच घरी येतो...तूपण तसंच कर...तुझी कामं पटपट कर रे...तुला माझ्याशी गप्पा मारायला आवडत नाही का???'

संध्याकाळी त्याच्यासोबत गप्पा मारणं खरंच इतकं अशक्य आहे का? त्यानं दिलेलं सोल्यूशन मला माझ्या कंपनीनंही किंवा आमच्या एचआरनंही कधी दिलेलं नव्हतं...

मला वाटायचं, मी माझी काम खूपच पटपट करतोय...कंपनी खूश आहे. कंपनी खूश असेल, पण ज्याला माझी 'कंपनी' खरोखरीच खूप हवीय, तो खूश आहे का?....

Sunday, February 21, 2010

सूर्यनमस्कार आणि सर

आमच्या शाळेतले सर सूर्यनमस्कार घालायला शिकवायचे. दहा सूर्यनमस्काराच्या बदल्यात मुठभर भिजलेले शेंगदाणे मिळायचे. आळस करायचो खूप आम्ही सगळे. काय हे बेणं सारखं छळतंय, असंही कधी वाटायचं. मुठभर शेंगदाणे मिळवण्यासाठी जिवाच्या करारावर सूर्यनमस्कार घालायचो. एखाद दिवशी एकही सूर्यनमस्कार न घालता शेंगदाणे मात्र मिळवायचो. रजिस्टर असायचं सरांचं. ते भरणाऱया मुलाला भीती दाखवून आमच्या नावावर सूर्यनमस्कार घालायला लावायचो. सर रिटायर्मेंटला आलेले. तरीही तुकतुकीत. झपाझप सूर्यनमस्कार घालायचे. आमच्यासोबत स्पर्धा लावायचे. आम्ही पाच पोरं मिळून जेवढे सूर्यनमस्कार घालायचो, त्याच्या दुप्पट सर बसल्या बैठकीला घालायचे.

हे सगळं परवा आठवलं. सूर्यनमस्कार नावानं राज्यभर हैदोस सुरू होता किंवा जागृती. पेपरात वाचलं. टीव्हीवर पाहिलं. डॉक्टरपासून सारे सूर्यनमस्काराचा जप करताना.

सहज प्रयत्न म्हणून सूर्यनमस्कार घालायला गेलो. पाठ वाकता वाकेना. पायातून कळ आली. ताण असह्य झाला. एक सूर्यनमस्कार म्हणून पूर्ण झाला नाही.

शाळा खरंच खूप छान असते. शाळेत असताना जो त्रास वाटायचा, तो त्रास नव्हता. सर आमच्यासाठी त्रास सहन करून घेत होते. आमच्या प्रकृतीसाठी. तेव्हा समजलं नाही. आता समजलंय. फुकट शिकवत होते सर. आज सूर्यनमस्काराचेही क्लास आहेत. त्यासाठी फी आहे. ती भरून जाणारे शेकडो लोक आहेत.

सर आठवले.

डोळे पाणावले.

आता सर नाहीत.

आता ठरवलंय, सूर्यनमस्कार घालायचे. सरांच्या आठवणीसाठी. मुलांनाही शिकवायचं. सरांची आठवण म्हणूनच. त्यावेळी त्यांना परतफेड नाही करू शकलो. समजलंच नाही त्यांच दान म्हणून. आता करायची. जरूर करायची.

Saturday, February 20, 2010

म्हातारी तिथंच सुखी आहे...

परवा बोलता बोलता म्हातारी म्हणाली, आता दिस किती उर्ले रं माझं? राहू दे की सुखानं हितंच...

एक जुनाट घर. पडकं म्हटलं तरी चालेल. जोराचा पाऊस आला, तर गळत्या ठिकाणी लावायला भांड्यांची मारामार. तीन महिन्यांपूर्वी संपलेल्या पावसाळ्याच्या खुणा अजून त्या खोपटात स्पष्ट दिसताहेत. तरीही म्हातारी म्हणते, राहू दे की सुखानं हितंच...

मी म्हातारीला म्हटलेलं, चल माझ्याबरोबर. शहरात राहू. या गावात काय मिळालंय तुला...? चांगली नोकरी आहे. घरी बायको आहे. पोरं आहेत. मजेत राहशील शहरात.

म्हातारी नाही आली. मनात त्या क्षणी चडफडाट झालेला. हट्टी आहे मुलखाची. आयुष्यात कधी माझं एेकायची नाही.

शहराच्या रक्तात परत मिसळून गेल्यावर दोन दिवस विचार करतोय.

म्हातारीचं बरोबरच तर आहे, असं आता वाटायला लागलंय. तिला तिथं सुख आहे. म्हातारीनं एक बोंब मारली, तर चार घरं धावत येतील इतकी ओळख आहे. जेवायला तोशीस पडू नये, इतकी शेती. खंडानं दिलेली. खंड वेळच्या वेळी येतोय. म्हातारीला काही त्रास नाही. दुखलं-खुपलं तर बघायला कोणी जवळ नाही, ही आपल्याला चिंता. तिला कधी वाटलीय? नाही. दुखलं-खुपलं तरी अंगावरच काढायचं आणि अगदीच काट्याचा नायटा झाला, तर डाग्तराकडं जायचं, ही तिची रित.

खोकल्याची किंचित उबळ मला डॉक्टरकडं पळवते. किंचितसा घाम छातीत धडकी भरवतो. पेपरवाले म्हणतात तो महागाईचा भस्मासूर आमच्या घरात उठता बसता नाचतो. आणखीही खूप काही म्हातारीला जे मिळतं, ते आम्ही इथं गमावतो...

बरोबरच तर आहे म्हातारीचं. पावसाळ्याच्या चार महिन्यातली गळती सोडली, तर तिला सुखच तर आहे. आणि गळतीही चार महिने कुठं असते? जेव्हा पाऊस पडतो तेव्हाच, हे तिचं साधं गणित.

शहरात राहून गणितं चुकलेल्या मला ते कळलं. पण, परत शहरात आल्यावर...मग आज पटलं, म्हातारी खरंच सुखी आहे. तिथं आहे म्हणून. जिथं जन्मली, वाढली, तिथंच माती होण्यात तिचं सुख आहे. ते सुख मी का हिरावून घेऊ?

Friday, February 19, 2010

सगळीकडं फक्त माणसं...

अखेर मिळाला.
सापडत नव्हता. हे ट्राय केलं. ते केलं. सगळं केलं.
डोकं भंजाळलं.
तरीही सापडत नव्हता. सगळीकडं शोधलं.
मग मिळाला.
म्हणजे तसा तो मिळालाच नाही.
बदलला.
ब्लॉगचा पासवर्ड.
ई मेलसुद्धा आठवत नव्हता. आणि पोस्टची हुक्की आली होती.
अलिकडं असं सतत होतं. विस्मरण. माणसं समोर आली की लक्षात येतात. नाव अजिबात आठवत नाही. चेहरा ओळखीचा वाटतो. माणसं खूप झालीत, त्यामुळं असं होतंय का?
काहीच लक्षात येत नाही. रस्त्यावर माणसं. गर्दी. सिग्नलला खेचाखेची. ऑफिसमध्ये माणसं. मुव्हीला गदारोळ. शांत म्हणून बाहेर जावं, तर गाड्यांची ही गर्दी. सगळीकडं फक्त माणसंच माणसं. मान्य आहे हे जग माणसांचंच आहे. पण, म्हणून काय सगळीकडं अशी खच्चून भरलेली असावीत? इतकी माणसं झाली, की कदाचित त्यांची किमत कमी होते का? मलातरी तसंच वाटतंय. हे अर्थशास्त्राप्रमाणेच. पुरवठा वाढला, की किमत घसरते. माणसांचीही घसरलीय. त्यामुळं अपघातांच्या बातम्यांवर फक्त नजर फिरते. बॉम्बस्फोट झाला का, अरे रे वाईट झालं, यापलिकडं भावना सरकत नाहीत. एकप्रकारचं साचलेपण हे माणसांच्या गर्दीमुळं निबर झालेल्या मानसिकतेचंच प्रतिक आहे.
म्हणजे असं मला वाटतंय. तुम्हाला वाटायलाच पाहिजे, असं काही नाही...!

Thursday, February 11, 2010

तरीही का सांगत नाहीस आई तू आता?

आई तू
लहानपणी सांगायचीस, अरे. नीट जेव. नुस्तं उष्टावू नकोस.
आणि
आता रोजचा प्रत्येक क्षण तर मी उष्टावतोय.
तरीही का सांगत नाहीस आई तू आता?

आंघोळ मस्त करावी, मनातंच राहतं.
गिझरच्या पाण्यात भसाभस विसण जातं.
दिवसाच्या कामाची उजळणी करत
पाणी अंगावरून झरझर तर सरतं.

हीनं केलेला प्रेमाचा शिरा
पेपर चाळताना पोटात ढकलतो.
घाईनं गाडीला किक मारताना
बाय म्हणणंही विसरतो.

रस्त्यावरच्या खड्ड्यांना
घातलेल्या शिव्यांमध्ये विरून जातोय
शेजारच्या मंदिरातला घंटानाद.
एन्कमिंग पंचिंग वेळेत झालं, की
वाटतं, टळली आजची ब्याद...!

पोराचं निर्व्याज हसू पाहायला
शाळेतल्या त्याच्या गंमती एेकायला
वेळ नाही मला.
मस्त, निवांत गाणं एेकायला
एेकलेल्या गाण्यावर तान घ्यायला
वेळ नाही मला.


कुठलाच आनंद
झिरपून सुद्धा
जात नाही आत.

आता रोजचा प्रत्येक क्षण तर मी उष्टावतोय.
तरीही का सांगत नाहीस आई तू आता?

गती मंदत्व आणि चार प्रश्न

महाराष्ट्रात आज-काल जे चाललंय, ते शुद्ध गती मंदत्व आहे.
गती मंदत्व म्हणजे वेडेपणा नव्हे.
गती मंदत्व म्हणजे सारासार विवेकाने कृतीची शक्यता गमावणे. तर्कशुद्धतेचा अभाव.
'सर्वन्यायी' सेना आणि जोडेवाहू सत्ताधारी यांच्यात आलेले गती मंदत्व महाराष्ट्राची धार बोथट करतेय.
कुणी कुठे खेळावे, कुणासोबत खेळावे, कोणत्या मुव्हीमध्ये काय करावे, काय बोलावे यापेक्षा काही महत्वाचे उरलेच नाहीय का?
पेपर उघडला की तेच. पेपर मिटून टीव्ही लावला की तेच. हापिसात जाऊन इंटरनेट उघडले की तेच. काय धंदा आहे हा?

१. रस्त्यावरून जाताना मला रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. हापिसात पोहोचलो की हुश्श वाटतं.
दिवसभर (बॉस असतानाही...!) कसं सेफ वाटतं.
संध्याकाळी जणू मृत्यूच्या वाहत्या गर्दीत गाडी चालवावीशी वाटतच नाही. धाडसही होत नाही. त्यामुळं हापिसात गप्पगार पडून राहतो.
गर्दीचा पूर ओसरू लागला, की हळूच पळतो. सकाळच्यापेक्षा थोडंफार तरी सेफ वाटतं.
गाडी निट, सुरक्षितपणे चालविण्याचा आत्मविश्वास मी गमावलाय, हा प्रश्न या 'गती मंदत्व आलेल्यांनी' उभ्या केलेल्या प्रश्नापेक्षा अधिक महत्वाचा नाहीय का?

२. घरचा गॅस अचानक संपला, की पोटात गुडगुड वाजतं. हातपाय गळतात अक्षरशः. आता कसं जगायचं, गॅस कुठून मिळवायचा हा प्रश्न पडतो.
कुणा-कुणाच्या हाता-पाया पडून गॅस जोडला, की त्या लबाडालाही मी त्या क्षणाचा देव मानतो.
लबाडांना देव बनविण्यानं आलेला हताशपणा कसा घालवू, हा प्रश्न या 'गती मंदत्व आलेल्यांनी' उभ्या केलेल्या प्रश्नापेक्षा अधिक महत्वाचा नाहीय का?

३. कुणाला पटो वा न पटो. महिन्याचं बजेट खरंच कोसळतंय. चेहऱयावरचा ताण वाढतोय. भाजीचे दर वयस्कर चेहऱयावरच्या सुरकुत्यांप्रमाणे वाढताहेत.
प्रवास करताना मला रानंच्या रानं शेतीनं लगडलेली दिसतात. तरीही साखर महागतेय, भाजी परवडत नाहीय, दुध कडू झालंय.
शेतीचं हे अर्थकारण असं कसं कसंही चालतं? हा प्रश्न मला पडणारा प्रश्न या 'गती मंदत्व आलेल्यांनी' उभ्या केलेल्या प्रश्नापेक्षा अधिक महत्वाचा नाहीय का?

४. मुलाच्या शाळेत पालकसभेला जातो मी. मुलाला कसं वाढवायचं, ही चिंता तिथं प्रत्येकाच्याच मनात दडलीय. कुणी उघड मांडतंय. माझ्यासारखं कुणी त्यांच्या मांडण्यावरून ठोकताळे बांधतंय.
आत्महत्येच्या बातम्या वाचून जीव गलबलतोय. तरीही मंत्री-संत्री बिनबोभाट फिरताना दिसतात. निबर कातडीने. जडावू शरीरानं.
मुलांच्या भविष्याचं काय? हा प्रश्न या 'गती मंदत्व आलेल्यांनी' उभ्या केलेल्या प्रश्नापेक्षा अधिक महत्वाचा नाहीय का?

हे चार प्रश्न म्हणजे मध्यमवर्गीयांचं जगणं नव्हे. हे अगदी मान्य.
पण, जे प्रश्न म्हणून मध्यमवर्गीयांसमोर उभं केलं जातं आहे, ते आमचे प्रश्नच नव्हेत, हे तरी मान्य आहे नं?

Wednesday, February 10, 2010

माणसांचं घेरणं आणि एकटेपणा

माणसांनी घेरलं जाणं त्रासदायक.
माणसांशिवाय जगणंही त्रासदायक.
मध्य कसा साधायचा?
म्हणजे मला हा प्रॉब्लेम येतो. नेहमीच.
मी काही माणूसघाणा नाही. माणस आसपास असणं हे मीही मान्य केलंय.
तरीही कित्येकदा, अलिकडे तर रोजच असं वाटतं, की इतकी माणसं कुठून आलीत भोवती?
यांना काय बोलवायला गेलो होतो का मी?
मग काय करतात ही इथे? आणि तिथे? सगळीकडेच?

बरं, माणसांशिवाय मला जंगल खूप आवडतं.
तिथं एकटं फिरायला. सूर्य जागा असताना.
फिकट अंधारही बरा वाटतो.
गडद अंधारात अंग शहारतं. कोणीतरी हवंच सोबतीला, हेही वाटतं.

कदाचित असं होतंय का, की जेव्हा जेव्हा शहरच माणसांचं जंगल बनतं
आणि तेही सूर्य जागा नसतानाचं,
तेव्हाच फक्त माणसांत असणं मला हवंसं वाटतं?

Tuesday, February 9, 2010

महाराष्ट्राचे संस्कृतीरक्षण

गंमतीनं घ्या हे.
सध्या हे जे काही चाललंय, त्यावरून सुचलंय.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्रालयातील नोकरभरतीसाठी प्रश्नपत्रिका:

पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या:
१. महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे काय?
- (फक्त) मुंबईत मराठी बोलणे.

२. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिक काय?
- (सोयीने यापैकी एक) मराठी भाषा, मराठी पाट्या, मराठी मेन्यू कार्ड, चित्रपटांतील मराठी, क्रिकेट.

३. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे रक्षण कोणी केले?
- ति. रा. रा. बाळासाहेब, चि. उद्धव, चि. राज या ठाकरे कुटुंबियांनी.

४. महाराष्ट्रावर इतिहासात कोणते ठळक गंभीर प्रसंग गुदरले?
- बिहारी शिरले, मराठी हरवली, पाकिस्तानी क्रिकेट खेळले, चित्रपटांचे नाव इत्यादी इत्यादी.

कशासाठी ठावूक नाही...

हे ब्लॉगिंग कशासाठी ?
ठावूक नाही.
मनातली मळमळ ओकण्यासाठी मुळीच नाही.
मनात मळमळ साचते कशाने? साचवल्याने.
आम्ही काही साचवत नाही.
साचून काही राहण्याचा प्रश्नच येत नाही.
अनेकदा डोकं भणाणतं.
मळमळ नाही; पण तळमळ वाटते. वाढते.
ही तळमळ मांडण्यासाठी.
त्यासाठी हे माध्यम.
नवं. कोरं. म्हणूनच मनापासूनचं.