Wednesday, July 21, 2010

चंद्राच्या जाळ्यात अडकला अशोकाचा मासा!

चंद्राबाबू नायडूंना जे करायचं होतं, ते त्यांनी केलं. पुरेपूर वसूल केलं. पडद्याआड गेलेल्या या 'सायबर लीडर'ला अख्ख्या नॅशनल मीडियानं डोक्यावर घेतलं. आंध्रातल्या नायडू समर्थकांनी आंदोलनं केली. चंद्राबाबूंना जे हवं ते सगळं सगळं मिळालं.

गमावलं ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी. अशोकरावांसोबत फिरणाऱया दीडशहाण्यांनी. चंद्राबाबूंना 'आत टाकण्याचा' विनोदी सल्ला देणाऱया प्रशासकीय चमच्यांनी.

समजा चंद्राबाबूंना नसतं 'आत टाकलं', तर काय घडलं असतं?

घडलं काहीच नसतं. ते आले असते आणि काहीच विरोध होत नाहीय, हे पाहून चडफडत गेले असते. नको तिथं 'अॅग्रेसिव्हनेस' दाखवण्याचा 'शहाणपणा' अशोकरावांना कधी नव्हे ते सुचला आणि अडचण पदरात पाडून घेतली. अशोकरावांवर वेळ इतकी वाईट आली, की चंद्राबाबूंसाठी खास विमाने मागवून त्यांना सोडायची पाळी आली. इतका राजकीय वेडगळपणा महाराष्ट्राच्या अख्ख्या इतिहासात कुठल्या राजकीय नेत्याने कधी केला नसेल.

मला एक भन्नाट कल्पना सुचली. चंद्राबाबूंना प्रसिद्धी मिळवायची होती नं? तीही मिळवून देता आली असती आणि महाराष्ट्राची इमेजही ठाकठीक राहिली असती. चंद्राबाबू 'आयटी सीएम'. महाराष्ट्र आज देशात आयटीमध्ये आघाडीवर जाण्याच्या (किमान) गोष्टी(तरी) करतो आहे. चंद्राबाबू आंदोलनासाठी येणार म्हटल्यावर महाराष्ट्रानं खरंतर या नेत्याचं तुफान स्वागत करायला हवं होतं. छान कमानी उभारून ठेवायला हव्या होत्या. त्यांनी महाराष्ट्रात पाऊल टाकताच, त्यांचं ओवाळून स्वागत करायला हवं होतं. जे काही दोन टीएमसीचं भुरटं धरण (खरंतर बंधारा) त्यांना पाहायचाय, तिथंच मंडप बांधून ठेवायला हवा होता. या मंडपात महाराष्ट्रातल्या टॉपच्या आयटी बॉसना आणि सेक्रेटरिएटमधल्या लोकांना तिथं बोलवायला हवं होतं. बंधाऱयाच्या बरोबरीनं 'इंडस्ट्रि'वरही चर्चा करूया, असं बाबूंना सुचवता आलं असतं.

बाबूंचा स्वभाव ज्यांना माहितीय, ते सांगू शकतील, की अशा चर्चेला बाबू रात्री झोपेतून उठवलं तरी तयार असतात. शेतकऱयांचा प्रश्न तर सोडवूच; शिवाय इंडस्ट्रीच्या वाढीसाठीही काही करूया, असं आवाहन बाबूंना केलं असतं, तर चंद्राबाबू हिरो बनू शकले नसते.

महाराष्ट्राची सध्याची प्रशासकीय यंत्रणा म्हणजे बाजारगप्पावीर आहेत. धोरण, मुत्सद्दीपणा या गोष्टी त्यांच्या अंगाला हजार योजने दुरूनही स्पर्शून गेल्या असतील, असं मानण्याची संधी अगदी क्वचित मिळते. कुठलाही प्रश्न येवो, अत्यंत घाईने, मुर्खपणाने आणि बालिशपणाने मुद्दा हाताळणे, ही त्यांची खासियत बनली आहे. अख्खं जग प्रत्येक प्रश्नाचा 'जरा हटके' विचार करून पाहते, वेगळ्या पद्धतीनं उत्तर मिळविण्याचा प्रयत्न करते आणि महाराष्ट्र मात्र 'हटके' विचारांपासून फटकून वागतो आहे. चंद्राबाबू उद्या आंध्रच्या आणि नंतर देशाच्या राजकारणात पुन्हा झळकू लागले, तर त्याचं 'श्रेय' सर्वश्री अशोकराव आणि त्यांच्या सल्लागारांच्या वेडेपणाला असणार आहे !!!

Thursday, July 15, 2010

लख्ख हसा आणि 'वीकली रोड शो' टाळा !

हसण्यात गंमत आहे. हसवण्यात गंमत आहे. कुणाच्याही चेहऱयावरचं हसू पाहण्यातही गंमत आहे. हसण्यानं नाती जुळतात. हसण्यातून नाती वाढतात. आज सकाळची गंमत. एरव्ही हाणामारीचा प्रसंग. तू-तू, मी-मी होणारच होतं. शिव्यांची लाखोली उगवणार होती. सकाळ-सकाळी नसता ताप डोक्यात घुसणार होता. सारं टळलं. सारं सारं. एका हसण्यानं. आयुष्यात पहिल्यांदा अनुभवलं. म्हणून अप्रूप...

प्रसंग असा होता:
बाईकवरून तंद्रीत निघालो होतो. ऑफिसची वेळ गाठायची होती. नेहमीप्रमाणं ट्रॅफिक तुंबलं होतं. जिथंतिथं तुंबलेल्या ट्रॅफिकच्या धुराचा वास कोंडलेला. डोक्यावर उन्हं. एेन जुलैच्या मध्यावर सकाळी दहाच्या वेळेसच रणरणतं उन्हं. अधून-मधून विनाकारण वाजणारे कर्कश्श हॉर्न. माणसांच्या मानसिकतेचं प्रतिबिंब त्या हॉर्नच्या आवाजातून डोकावणारं !

सिग्नल सुटला. गाड्या तिरासारख्या पुढं धावल्या. पुढच्या चौकाचा सिग्नल रेड व्हायच्या आत ओलांडायची घाई साऱयांना लागलेली. मीही त्यातलाच. सुस्साट सुटलेली बाईक कच्चकन ब्रेक लावून थांबवली ती पुढचा सिग्नल रेड लागला म्हणून. मी अचानक थांबलो, तसेच पॅरलल गाड्याही थांबल्या. सगळे माझेच भाऊबंद. थांबल्याच्या क्षणानंतर दोन सेकंदात मागून धाड्कन धडक बसली आणि मी जवळपास पुढे उडालोच. कोसळलो नाही इतकंच. बाकी सगळं झालं. धडपडलो. आणि सगळा राग त्या क्षणी डोक्यात साठून आला. इतकी तिडिक की मी मागंही नं पाहता बाईक भर सिग्नलला स्टॅंडवर लावली आणि उतरलो. मागं पाहिलं; तर साधारण माझ्याच वयाचा, माझ्याच सारखा खांद्याला लॅपटॉप अडकवून चाललेला आणखी एक 'नोकरधारी' !

आता याला सोडायचं नाही, या विचारात गाडीची काही मोडतोड झालीय का पाहात त्याच्याकडं वळलो.

त्यानंही गाडी लावली. मी किंचितही न दुखावलेले इंडिकेटर चेक करत असताना 'नोकरधारी'नंही गाडी तश्शीच लावली आणि माझ्याकडं येताना दिसला. मी वाकून जणू राग वाढवत गाडी चेक करत असताना खांद्यावर अलगद हात ठेवला गेला. 'आय एम सॉरी...', 'नोकरधारी' लख्ख आवाजात म्हणाला.

मी मागं पहिल्यांदा सिग्नलकडं पाहिलं. अजून ४० सेकंद बाकी होते. मग सरळ उभा राहून 'नोकरधारी'ला नजर भिडवली.

चेहराभर पसरलेलं हसू, हसरे डोळे.

थक्कच झालो. भर सिग्नलला, दगदगीच्या शहरात, एक अपघात घडवूनही त्याचा चेहरा मस्त छान हसरा.

मी क्षणभर सुन्न. 'आय एम सॉरी. मला खरंच माफ करा. मला आवरली नाही बाईक. नवीन आहे नं...', 'नोकरधारी' जणू वर्षानूवर्षीचा मित्र बोलावा तसा अगदी हसऱया चेहऱयानं बोलत राहिला.

काहीच न सूचून मी गाडीवर बसलो. सिग्नल सुटला. पुढं आलो. आणि बाईक पुन्हा बाजुला घेतली. एरव्ही या अशा धडकांचे रिझल्ट ठरलेले. दोघांनीही वाद घालायचे. भरपूर. कुठले तरी राग इथं काढायचे आणि मग मार्गस्थ व्हायचे. आज काहीतरी वेगळं जाणवलं होतं.

'नोकरधारी'ही पाठोपाठ आला. माझ्या मागं थांबला. बाईकवरून उतरला. जवळ आला आणि पुन्हा लख्ख आवाजात हसत म्हणाला, 'आय एम सॉरी...'.

ना राग ना चीडचीड. चेहराभर फक्त हसू.

मलाही राहावेना. मीही हसलो. 'इट्स ओके buddy!...'

'Sure. पुन्हा पण, असं नको...!'...'नोकरधारी'चं लख्ख हसू.

बाईकवर बसून तो भुर्रकन निघून गेला.

मीही निघालो. विचारात ऑफिसही गाठलं. सगळं वेळेवर जमलं. मग जाणवू लागलं, अरे, हा नसता हसला तर? काय घडलं असतं? वीकली रोड शोच नं? याच्या एका हसऱया स्वभावानं कसला भारी बदल घडला...राग पाहता पाहता पळून गेला. एक स्वच्छ हसू आणि 'आय एम सॉरी'नं रोड शोला किती छान बदलून टाकलं. आणि आपण इतके भंपक की त्याचं नावही नाही विचारलं...

Wednesday, July 14, 2010

जन्मोजन्मीचे देणे...

सांजवेळ ढळताना
रात सारी कलताना
सय आठवांची उरी

ओले मोती होते साथी
सारे तुझेच सांगाती
आसवांची दाटी आता
उरे माझ्या गं सोबती

प्रकाशाची रेघ भाळी
किरणांची गं तू नव्हाळी
पाणावल्या डोळ्यांत आता
अंधाराची नक्षी सारी

चालताना आभाळात
हात होता तुझा हातात
झाला चांद पोरका आता
वनवास चांदण्यांत

तुझा भास खुणावे
आण तुझी सतावे
जन्मोजन्मीचे देणे आता
कोण्या जन्मी फिटावे?