Wednesday, December 17, 2014

दफन होताहेत आयांचे आक्रंद

चिरडली जाताहेत
उद्याची स्वप्नं
बंदुकीच्या दस्त्यानं
धर्माच्या नावाखाली...

अल्ला, राम, जीझस्
कम्युनिस्ट, डेमोक्रॅटिक
रेषांमध्ये अडकवलाय
माणूसकीचा नकाशा

शाळेच्या दफ्तरांवर
रक्तानं रंगवताहेत
ते विकृतीचे इरादे
दहशतीचे वादे

शांततेचे संदेश
टरकावले जाताहेत
दफन होताहेत
आयांचे आक्रंद

अशांत दिवस
अस्वस्थ रात्री
क्षणोक्षणी होतेय
इथे मृत्यूची गणती

हाकारे देताहेत
चिरंतन शांततेसाठी
बधीर कानांपर्यंत
आंधळेपणानं पोहोचण्यासाठी...

Thursday, June 19, 2014

आता सोयर नाही...

अस्तित्वाचा प्रश्न
तुझ्या श्वासानं
फक्त
काहीच क्षण
गहन होण्यापासून
वाचला...

अन्यथा अंधार
मित्र; सोबतीही..
अनाठायी ठरली
भीती
उजेडानं पुन्हा
फणा काढण्याची

झाली खात्री
श्वासांचे क्षण
न परतण्याची
आणि
तळाशी जाणिव
विरक्तीची...

संदर्भहीन तुकडे
सुसंगत जोडलेले
तुझ्या
मिठीचे त्याला
आता सोयर
नाही...

Saturday, April 26, 2014

पुन्हा एकदा...

पुन्हा फिरून
जगायच्यात
त्या आठवणी...


तुझी कविता...
तुझं पुस्तक...
पुस्तकातल्या त्या ओळी...

पुन्हा एकदा फिरून
जगायच्यात...


मऊशार लाटांनी
भिजलेल्या बटा
अलगद सरकत
काळजात घुसलेल्या...
रोखू रोखू म्हणताना
धावलेलं वेडं मन..
चिंब अंग ओलं अन्
श्वासांचं संपलेलं अंतर...

पुन्हा फिरून
जगायचंय
ते शुन्य अंतर...


फुल उमलतं ते
कोमेजण्यासाठीच?
तुझ्या प्रश्नानं
झालेली काहिली
डोळ्यांपाशीच दाटलेले
ढग थोपवलेले
अन् अंतरीच्या कोपऱयात
भटकं काहूर माजलेले

पुन्हा एकदा फिरून
जगायचंय
ते भटकं काहूर...