Showing posts with label nostalgic. Show all posts
Showing posts with label nostalgic. Show all posts
Monday, March 1, 2010
सूर्यास्ताचा अटळ उत्सव...
सूर्यास्त मला नेहमी कासावीस करतो.
हुरहूर लावतो.
काहीतरी हातातून निसटतंय, आयुष्यातून दूर चाललंय ही भावना सूर्यास्ताच्या क्षणी मनात घर करू लागते. पश्चिम क्षितिजापासून हातभरावर सूर्यगोल आला, की मी नदीच्या त्या उंच टेकाडावर विसावतो. ही माझी आवडती जागा. सूर्यास्ताचा अटळ उत्सव पाहण्याची. या उत्सवाची रेघ न् रेघ आणि कण न् कण मनात साठवायची आस लागते. आभाळात पांढुरक्या ढगांची दाटी असेल, तर सूर्यास्त म्हणजे रंगांचा सोहळा बनतो. लाल-तांबड्या रंगाच्या अक्षरशः अगणित छटांचा मनसोक्त कॅनव्हास होतो. नारिंगी, केशरी, भगव्याची उधळण सुरू होते.
पाहता पाहता तेजोगोल डोंगराआड जायला लागतो.
कासावीसपणा सुरू होतो, तो इथं.
त्याचं इंच-इंचानं डोंगराआड रुतत जाणं मनांत विलक्षण कालवाकालव सुरू करतं.
आता एक कोर तेवढी राहलीय. दिवसाच्या प्रकाशाची ही शेवटची खूण. आभाळ रंगांनी न्हावून गेलंय आणि ही कोर सगळं काही आवरून जायच्या तयारीत आहे. ती कोर दिसेनाशी झाली की एक हलकीशी थंडगार झुळूक नदीवरून सुटते. जणू काही, 'सूर्य गेला...' हा सांगावा आणते. झुळूक नव्हेच ती. ती तर कुजबूज...त्याचक्षणी आकाशात एक काळीभोर रेघ उमटू लागते. हळू हळू ही रेघ पुढं पुढं जाऊ लागते. वटवाघळांचं चित्कारणं मधूनच कानावर पडायला लागतं. प्रकाशाचा पसारा आटपू लागतो, तसं आकाशभर या भेसूर पक्ष्यांची दाटी व्हायला लागते. कुठंतरी दूरवर त्यांचा प्रवास सुरू झालेला असतो.
नदीत अर्ध्याअधिक बुडून बसलेल्या म्हशी या अंधारयात्रींच्या चाहुलीनं अंग झटकत बाहेर पडू लागतात. आपापल्या गोठ्यांच्या दिशेनं न बोलता त्यांची चाल सुरू होते.
सारेजण परतीच्या प्रवासाला लागतात. मुक्कामाच्या प्रवासाला.
ही सारी कातरवेळ. करकरीत तिन्हीसांज.
सूर्य बुडालेला. अंधार अजून कब्जा करायचाय. आकाशात वटवाघळं. आसमंत शांत. मन कातरतं. आठवणींनी व्याकूळ होतं. कुणाच्या कुणाच्या आठवणींची दाटी मनात व्हायला लागते. सुटलेला हाताचा स्पर्श नेमका हाच क्षण पकडून जाणवायला लागतो...एकानंतर दुसरी. दुसऱयात तिसरी..त्यातच गुंतलेली चौथी...आठवणींची अनंत साळखी ओवली जाऊ लागते...
'उद्या परत हाच सूर्यास्त आहे. असाच आहे अगदी,' असं कॉन्शस मन कुठंतरी करवादत असतं. पण, सबकॉन्शस ते काही एेकायला तयार नसतं. आठवणी आणि आठवणी. गुदमरायला होतं. त्यातून सुटायसाठी तडफड सुरू होते. प्रत्येक तडफड आठवणींचा कासरा अधिकच आवळते. कासावीसपण तीव्र होऊ लागतं. डोळे घट्ट मिटले, तरी ओघळणारा अश्रू फट शोधून बाहेर येतो...
निग्रहानं डोळे उघडू लागलो, की अंधारलेलं दिसू लागतं. मनाचा हिय्या करून उठतो. सबकॉन्शसचं भूत आता उतरू लागलेलं असतं. मनाला आलेला थकवा जाणवू लागतो. पाय उचलून घराची वाट धरतो...सूर्यास्ताचा अटळ उत्सव मनावरची पकड सैलावतो. गल्लीपर्यंत पोहचेतो कॉन्शस झालेला असतो. शांतपणा परतलेला असतो...
सूर्यास्ताचा अटळ उत्सव असं मनाला उलथंपालथं करतो. खळबळून काढतो. तरीही हवासा वाटतो....
म्हणूनच तर दुसऱया दिवशी बरोबर त्याच टायमिंगला मी त्याच जागी आलेलो असतो...
Sunday, February 21, 2010
सूर्यनमस्कार आणि सर
आमच्या शाळेतले सर सूर्यनमस्कार घालायला शिकवायचे. दहा सूर्यनमस्काराच्या बदल्यात मुठभर भिजलेले शेंगदाणे मिळायचे. आळस करायचो खूप आम्ही सगळे. काय हे बेणं सारखं छळतंय, असंही कधी वाटायचं. मुठभर शेंगदाणे मिळवण्यासाठी जिवाच्या करारावर सूर्यनमस्कार घालायचो. एखाद दिवशी एकही सूर्यनमस्कार न घालता शेंगदाणे मात्र मिळवायचो. रजिस्टर असायचं सरांचं. ते भरणाऱया मुलाला भीती दाखवून आमच्या नावावर सूर्यनमस्कार घालायला लावायचो. सर रिटायर्मेंटला आलेले. तरीही तुकतुकीत. झपाझप सूर्यनमस्कार घालायचे. आमच्यासोबत स्पर्धा लावायचे. आम्ही पाच पोरं मिळून जेवढे सूर्यनमस्कार घालायचो, त्याच्या दुप्पट सर बसल्या बैठकीला घालायचे.
हे सगळं परवा आठवलं. सूर्यनमस्कार नावानं राज्यभर हैदोस सुरू होता किंवा जागृती. पेपरात वाचलं. टीव्हीवर पाहिलं. डॉक्टरपासून सारे सूर्यनमस्काराचा जप करताना.
सहज प्रयत्न म्हणून सूर्यनमस्कार घालायला गेलो. पाठ वाकता वाकेना. पायातून कळ आली. ताण असह्य झाला. एक सूर्यनमस्कार म्हणून पूर्ण झाला नाही.
शाळा खरंच खूप छान असते. शाळेत असताना जो त्रास वाटायचा, तो त्रास नव्हता. सर आमच्यासाठी त्रास सहन करून घेत होते. आमच्या प्रकृतीसाठी. तेव्हा समजलं नाही. आता समजलंय. फुकट शिकवत होते सर. आज सूर्यनमस्काराचेही क्लास आहेत. त्यासाठी फी आहे. ती भरून जाणारे शेकडो लोक आहेत.
सर आठवले.
डोळे पाणावले.
आता सर नाहीत.
आता ठरवलंय, सूर्यनमस्कार घालायचे. सरांच्या आठवणीसाठी. मुलांनाही शिकवायचं. सरांची आठवण म्हणूनच. त्यावेळी त्यांना परतफेड नाही करू शकलो. समजलंच नाही त्यांच दान म्हणून. आता करायची. जरूर करायची.

Subscribe to:
Posts (Atom)