(फोटो काय आपला नाही. कुठून घेतला; आठवत नाही. ज्यानं काढला, त्याला सलाम...! आमच्या मनातलं त्यानं फोटोतनं दाखवलं म्हणून...)
पावसासारखं सुख नाही. धबाधबा कोसळणाऱया पावसात धुंद होऊन बाईक चालविण्यासारखं सुख खरंच नाही. अनुभवलं असेल, तर प्रश्नच नाही. नसेल कधी अनुभवलं, तर यंदाच्या पावसाळ्यात एकदा तरी अनुभवा. व्यक्तिशः मला हा प्रकार भयाण आवडतो. कधी एकदा पाऊस कोसळतो, असं होऊन जातं. मित्र बोंबलत असतात, की येड्या, पाऊस तेवढा नको रे आणि मी म्हणत असतो, अरे, येऊदे रे...येऊदे रे...
बाईक राईडसाठीचा पाऊस कसा झडझडून हवा. तासन् तास कोसळणारा. उगाच एखादी भुरटी सर सोडून जाणारा नव्हे. महाबळेश्वरसारखा किंवा कोयनेतल्या नवजासारखा. चिंब चिंब करणारा. नखशिखांत शिरशिरी आणणारा. महाबळेश्वरमध्ये एकदा अशा पावसात बाईक राईड केली होती. तिथंला पाऊस मुळातच अफाट. अंगावर येऊन येऊन धडका देणारा. तडातडा वाजणारा. एक एक थेंब गड्डी लसणाएवढा. पावसाचा स्वतःचा रौद्र नाद असतो, तो इथं अनुभवायला नक्की मिळतो.
महाबळेश्वरमध्ये अशा भर पावसात बाईक राईड करताना एकप्रकारची तंद्री लागते. आपोआप. आसपासचं काही भान राहात नाही. वीस-पंचवीस फुटी रस्ता. निर्मनुष्य. मागून गाडी नाही की पुढून नाही. सारं महाबळेश्वर गपगार झालेलं. फक्त एक बाईक. पावसात रस्ता कापत चाललेली. अशा पावसाशी मस्ती करायची नसते. दोस्ती करायची असते. म्हणजे, मस्तवालपणे बाईक मारायची नसते. पावसाला दाद देत, त्याच्याशी बोलत, त्याला मोठ्ठं मानून, मान देत हळू हळू चालायचं असतं. मस्तवालपणा केला, की कुठला तरी खड्डा तुमच्यासाठी आ वासून बसवतोच हा पाऊस...!
जुन्या महाबळेश्वरकडून येताना अशी झड लागली होती. दोन्ही बाजूंनी झाडी. ओलीचिंब. पानं पानं जणू पाझरायला लागलेली. पाण्याचे लोटच्या लोट रस्त्यातून वाहू लागलेले. वरून सर्र सर्र सपाटा सुरूच. रेनसूट नावाचा प्रकार अंगाला चिकटून बसलेला. वातावरणात फक्त पाऊस आणि पाऊस. सगळं जग नष्ट झालंय आणि सगळीकडं फक्त पाऊस उरलाय, असं फिल देणारा अॅम्बियन्स...पंधरा-वीस किलोमीटरच्या स्पीडनं अशी बाईक मारताना डोकंही आपोआप थंड होत गेलेलं. विलक्षण शांतता शरीरात भरू लागलेली. पावसाच्या प्रत्येक थेंबागणिक मेंदूतले विचार क्षीण होत गेलेले. समाधीबिमाधी वगैरे तत्सम प्रकारचा हा अनुभव...अचाट. अफाट. फक्त पाऊसच आणि तोही महाबळेश्वरसारखा पाऊसच देऊ शकेल असा अनुभव...
पुढचे दीड-दोन तास कसे गेले कळलं नाही. जसा वेगानं सुरू झाला, तसाच तो कोसळत राहिला...वाटेत थांबून थांबून ही ध्यानस्थ अवस्था अनुभवत राहिलो...दोनेक तासांनी जोर किंचितसा उतरल्यावर भान स्थिरस्थावर होऊ लागलं. स्वप्नामधून कुणीतरी अलगद उठवत असल्याची जाणिव होऊ लागली. महाबळेश्वरच्या मुख्य चौकापर्यंत आपण पोहोचलोय, हे कळण्याइतपत मेंदू जागा झाला...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment