तुमच्याबद्दल लिहायचंय. तुमच्याबद्दल मला काय वाटतंय, हे सारं काही लिहायचंय. मोकळं व्हायचंय एकदा लिहून. खूप साचलंय सगळं. मनात रडायची सवय घातक. कधी जडलीय मला, तुम्हालाच माहिती. मोठ्यांदा रडायची सवय नाही आणि मनातल्या हुंदक्यांनी आत अंगभर कसर राहतेय.
डोक्यात आठवणींचा कल्लोळ आहे. खूपशा. एकमेकांत गुंतत गेल्यात. काय लिहायचं, सुरूवात कशी करायची हेच सुचत नाहीय इतके दिवस.
तुम्ही होता, तेव्हा कदाचित तुमचं अस्तित्व माझाच भाग होतं. ते लक्षातही नव्हतं आलं कधी...आता प्रत्येक दिवशी, जवळपास प्रत्येक क्षणी तुम्ही मला आठवताय. एक-दोन दिवस नाही, वर्षभर होतंय असं. आता जाणवतंय बाबा, तुम्ही माझ्यासाठी काय होतात...
खूप लहानपणी, म्हणजे माझ्या लहानपणी आपण दोघं मित्र होतो. शाळेतून यायच्या वेळी तुम्हीच तर घरी असायचात. भरवलेला प्रत्येक घास मला आत्ताच का रोज आठवतोय बाबा? तुमची नोकरी गेली होती आणि धंद्यात फसवणूक झाली होती, हे कधीच कसं तेव्हा लक्षात नव्हतं आलं? मी शाळेतून येताना दारात पायऱयांवर बसलेले तुम्ही दिसला नाहीत, तर होणारी चिडचीड लख्खं आठवतीय. आताही रोज घरी जाताना फ्लॅटचं दार उघडताना हीच चिडचीड होतेय बाबा...
खूप लिहायंचय बाबा. तुमच्याबरोबर जगलेला प्रत्येक क्षण लिहून काढायचाय. त्याशिवाय मोकळा होणार नाही बाबा मी...आणि कदाचित तुम्हीही...
No comments:
Post a Comment