Monday, December 12, 2011

जाता जाता

जाता जाता 
देऊन जा...
उरलेलीही सारी दुःखं
विसरलेले ते शाप
राहून गेलेले ते डाग

जाता जाता 
देऊन जा...
तोच संताप
तीच जळजळ
विसरू पाहे 
विसरत नाही; 
ओल्या पानांची ती सळसळ


जाता जाता 
देऊन जा...
मालवलेले सारे दिवे
ओंजळीतला अंधारही
न जाणो, उजेडानं 
दिपल्या डोळ्यांना 
होईल कधी आधारही


कुठला जन्म? कुठलं देणं?
दिलं तरी फिटत नाही...
एका जन्मी खुप दिलंस
पुन्हा जन्म घेववत नाही...


जाता जाता 
देऊन जा...
दिलेलंही सारं काही...

Monday, October 24, 2011

मी कसं जगतो...?

जगावं कसं वगैरे शिकवावं लागतं, यावर आपला अजिबात विश्वास नाही. आपण म्हणजे मी. स्वतःला किंचित आदरानं वागवतो. खूपदा लोकं विचारतात, की का बाबा, तुला टेन्शन कसं येत नाही? मी किंचित हसतो. प्रश्न उडवून लावतो. टेन्शन घेणं नं घेणं हा च्याचा त्याचा प्रश्न, असं उत्तर देतो. मला खूप छोट्या गोष्टींत आनंद शोधता येतो. म्हणजे जगावं कसं हे दुसऱयांकडून शिकावं लागत नाही. अर्थातच, हे शिकणं आपल्याला मान्य नाही, हे आधीच सांगितलं आहे.

माझा एक मित्र आहे. बाईकवर मागं बसला, तर त्याच्या हाताची बोटं खांद्यात रुतत राहतात. मी बाईक धड चालवतोय की नाही, याची त्याला काळजी. समोर ऑटो आली अचानक तर ब्रेकच्या आधी याची बोटं खांद्यात घट्ट रुतलेली लक्षात येणार, इतकी काळजी त्याला. थंडीत स्वेटर-कानटोपी, मफलर इत्यादी. उन्हाळ्यात कॅप, मास्क इत्यादी. पावसाळ्यात छत्री, रेनकोट इत्यादी. असं याचं जगणं. वय वर्ष 35. उन्हाळ्यात मस्त उंडारावं आणि पावसाळ्यात पावसात मनसोक्त भिजावं आणि थंडीत दुलईत xxx वर करून तासनं तास लोळत पडावं म्हणजे जगणं हे कधी कळत नाही त्याला. मग विचारत बसतो, की का रे बाबा, टेन्शन कसं येत नाही तुला?

टेन्शन न घेणं हा काही गुन्हा नाही. मला तर वाटतं, टेन्शन घेणं हाच एक गुन्हा आहे. अरे, सालं ही नोकरी-धंदा करतो कशासाठी आपण? चांगलं जगता यावं म्हणूनच नं? मग तेच जमत नसेल, तर काय अर्थ आहे या जगण्याला, असा प्रश्न आपण आपल्याशीच कधी विचारत नाही, यात खरी मेख आहे. काय आहे, काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहिती असतात. ती मिळाली, तर मग पुढं काय करायचं, हा आणखी एक उपप्रश्न असतो. त्यामुळं प्रश्नच विचारत सुटायचे, उत्तराकडं ढुंकूनसुद्धा पाहायचं नाही, अशी आपली प्रवृत्ती बनते. ही प्रवृत्ती म्हणजे टेन्शन. स्वतःला आलंय असं वाटलं, की दुसऱयाला विचारत सुटतो आपण...


असो. वाचून सोडून द्या. खूप दिवस काहीच लिहिलं नाही, म्हणून आज बडवत बसलो ;)

Tuesday, August 30, 2011

अण्णांच्या 'क्रांती'चा अर्थ


युरोपात पहिल्यांदा राजकीय क्रांती घडली ती औद्योगिकीकरण क्रांतीनंतर. भारतात ते पोहोचलंच नाही. दुसऱया महायुद्धानंतरही राजकीय क्रांती अनेक ठिकाणी घडली. तिचा फायदा भारताला मिळाला. स्वातंत्र्याच्या रुपानं. तिसरी क्रांती घडली, ती माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात. त्यात गेल्या दोन दशकांत भारतानं आघाडी ठेवलीय. या क्रांतीनंतर स्वाभाविक त्याचे राजकीय परिणाम उमटणार होते. ते अण्णांच्या आंदोलनात दिसले, असं माझं वैयक्तिक मत :)

तंत्रज्ञानाच्या विकासासोबत माणसाच्या सामुहिक विकासाच्या संकल्पना बदलत जातात. संकुचित गोष्टींपासून सुटका होऊन माणूस व्यापक समाजहिताकडं पाहायला लागतो. किंबहुना पाहण्याचा आभास स्वतःभोवती निर्माण करतो. हा आभास निर्माण करणंही खूप महत्वाचं आहे. कारण, त्या आधीच्या काळात तो फक्त वैयक्तिक संकुचित विचार करत असतो. हा समाजहिताचा आभास निर्माण होणं आणि त्यातून प्रत्यक्ष कृतीकडं, ज्यातून सामाजिक हित आणि पर्यायानं वैयक्तिक विकास शक्य आहे, त्याकडं समाजातील प्रत्येक जण, इच्छा असो वा नसो, ढकलला जाणं, ही प्रक्रिया घडते. क्रांती म्हणजे हे असं काहीसं ढोबळ मानता येईल. तर, तंत्रज्ञानाच्या विकासासोबत हे घडायला लागतं. त्याचे परिणाम तत्काळ नाही; मात्र एक-दोन दशकांत दिसू लागतात.

भारतात हे अगदी असंच घडतंय असं वाटू लागलंय. ग्लोबलायझेशननंतर पहिल्यांदा काय झालं, तर सत्तेच्या एकेंद्रीकरणाला लोकशाही मार्गानं लोकांनी विरोध केला. आघाड्यांची सरकारं यायला लागली. ती स्थिर व्हायला लागली. कोणत्याही एका पक्षाच्या नादी लागायचं नाही, हे लोकांनी ठरवलं. त्यानंतरच्या काळात म्हणजे ग्लोबलायझेशनच्या दुसऱया दशकात एका पक्षाला बळ आणि बाकीच्यांना पुरेसा विरोध करण्याएवढी ताकद लोकांनी दिली.

निवडणूक मार्गानं बदल होत नाहीत, असं दिसलं, की आवश्यक ते बदल घडवून आणण्यासाठी संघटित आंदोलनाचे मार्ग वापरणं आणि त्यासाठी विकसित तंत्रज्ञान वापरणं हेही घडू लागतं.

अण्णांच्या आंदोलनात याचं दर्शन घडलं. ही काही परिपूर्ण क्रांती वगैरे नाही. तसंही कुठलीच क्रांती कधी परिपूर्ण नसते. क्रांती एखाद्या बदलाची सुरुवात करून देते. हा बदल होण्यास काही कालावधी लागतो आणि कधी कधी बदल होऊन नव्या जगाची व्यवस्था प्रस्थापित झालीय, हे समजण्यासही वेळ लागतो. हेच अण्णांनी घडवून आणलेल्या बदलांबाबत म्हणता येईल. आताच काहीबाही अर्थ-अन्वयार्थ लावून साऱया गोष्टी झिडकारणं तद्दन भंपकपणा ठरेल. जितकं महत्व आहे, तितकं ते समजून घेणं आणि त्यानुसार अर्थ लावणं इतकंच सध्यातरी केलं पाहिजे....

Tuesday, June 28, 2011

त्या क्षणांचे फितूर..


त्या क्षणांचे फितूर
सारेच भागीदार
लक्ष लक्ष वेध
आता यातनांचे...


मनात पूर्ण आकार येता येता विरून जाणारी प्रत्येक भावना आत कुठंतरी सतत ठुसठुसत असतेच. लिहायचंही असंच होतंय. मनात इतके विषय फेर धरून नाचत राहतात अन् एेनवेळी कुठंतरी दडी मारतातच. बोंबबलं मग सगळं. 

आता पुन्हा लिहायचं...

Monday, April 18, 2011

आता नाही...

आता नाही भिजायचं
मस्त कोरडं राहायचं

पावसात चिंब होतानाची
तुझी आठवण मग
मनातच छान होरपळेल
आणि उन्हाच्या कल्हईनं
वाळून जाईल घालमेल

आता नाही फिरायचं
मस्त बसून राहायचं

रस्तोरस्ती सांडलेल्या खुणा
तुझ्या माझ्या भेटीच्या
मग पुसटतील हळू हळू
आणि रस्ते पुन्हा
अनोळखी पहिल्यासारखे

आता नाही गायचं
मस्त फक्त एेकायचं

एक-एक तान शिकवतानाच्या
तुझ्या तऱहा होतील
विरळ मनाच्या कोपऱयात
निपचित पडून राहतील
सोबत आठवणींचा दरवळ


आता नाही कण्हायचं
आणि कढत श्वासासाठी
जन्मभर उन्हात थांबायचं...