Friday, November 9, 2012

पाऊस मनीचा

| असा आला
 असा आला
 सारा दुरावा
 सरला...|

| धुंद मन
 चिंब तन
 अंगी वणवा
 पेटला...|

| हात हाती
 ओली माती
 भान बेभान
 बेईमान...|

| सुर जुळे
 ताल धरे
 मुक्त स्वच्छंद
 आनंद...|

| साथ तुझी
 सुटे क्षणी
 कळ भाव
 जीवघेणा...|

| सरी साऱया
 नभी उभ्या
 आता डोळेची
 पाझरे...|

| नको नको
 असा जाऊ
 आर्त आक्रंद
 जन्मोजन्मी...|

Monday, November 5, 2012

माझाच भवताल...

...मग माझाच भवताल
समोर ठेवून उलगडून
मी पाहू लागतो...
चकचकीत एक्स्प्रेस वेवर
सत्याला गाडून ठेवलंय
आणि वर त्याबद्दल
माझ्याचकडून घेताहेत टोल
मीही न चुकता भरणार;
त्यांच्या गाडण्याला दाद म्हणून...
शेजारीच दणदणून उगवलेली
भ्रष्टाचाराची हायसिंथ आणि
त्याखाली कुजत पडलेलं
मानवीपण सडक्या
मनानंच पाहतो...
नकळत आपोआप
पुढं सकटतो...
मला दिसतं, आईनं दिलेलं
संचित आता ठाम
निरुपयोगी झालेलं...
सत्य बोल, जग जवळ कर,
इत्यादी इत्यादी खरंतर
अगदीच भंपक...
मी माझ्या कोषात
माझ्यातच अधिक
सुरक्षित...जगाला दूर ठेवून
आणि सत्य-असत्याच्या फंदातही
न पडता स्वतःत राहून..

भोवताल उलगडला, तेव्हा
जळजळीतपणे हे उलगडलं आधी...
रोजची धाव, सिग्नल आणि
धुरानं कोंडलेलं पर्यावरण...
जगण्याचं राजकारण
निबर होत चाललेल्या कातडीला
आणखी कुरतडतं, तेव्हा..

...मग माझाच भोवताल
समोर ठेवून उलगडून
मी पाहू लागतो...

Wednesday, March 28, 2012

म्हणून तर जगणं सुंदर होतं...

हे असंच होतं...
म्हणून जगणं सुंदर होतं...

दुखला हात खुपला पाय
सोबतीला तु होतीस...
दुखऱया जखमेवर 
तुच तर मलम होतीस...

हे असंच होतं...
म्हणून जगणं सुंदर होतं...

हे नको, तेच हवं
नाहीतर काहीच नको...
हा हट्ट तुझ्याचजवळ
तुच तर प्रत्येक प्रश्नाला
उत्तर होतीस...

हे असंच होतं...
म्हणून तर जगणं सुंदर होतं...

पहिलं वगैरे नसलेलं
प्रेमही तु होतीस...
रागाची पहिली शिकारही
मग तुच होतीस...

हे असंच होतं...
म्हणून तर जगणं सुंदर होतं...


हे असंच राहिलं असतं...
तर जगणं खरंच सुंदर होतं...

आता तसं नसतं आई
माझं मीच निस्तरतो जगणं
तुझ्या आठवणीत झुरणं
आणि पिलाला कुशीत घेणं...

Saturday, March 24, 2012

ठसा जपून ठेव

जाणिवेच्या प्रत्येक पावलावर
अलगद उमटलेला
चक्काचूर झालेला
भावनांचा ठसा
तु असाच जपून ठेव...

कधीतरी ठशांमध्येच दिसतं
भेसूर प्रतिबिंब जे
कळत नकळत
असू शकतं अशांचं
ज्यांना आपण गमावलं...

कधीतरी प्रतिबिंबंही देतात
आत्मभान सहजी जे
हरवलेलं होतं
कुठंतरी अडगळीत पडून
राहिलं होतं सडत...

कदाचित प्रतिबिंब, ठशांचा
सारा खेळ होता
जपून ठेवण्यासाठी
जे नव्हतं
कधीच तुझं अऩ् माझंही... 

Monday, February 20, 2012

इंद्रासारखं दान...

कधीतरी लिहून ठेवलेल्या या ओळी ;)

 इंद्रासारखं दान...*


चंदेरी मोती; शुभ्र पोवळे
हिरवे पाचू; लाल खडे
*माग मला
देईन तुला*
नको मागू
इंद्रासारखं दान कधी
कर्णाकडं मागू नको...

निळ्या आकाशाची निळाई
अन् ढगांची दुलई
नाचरी चांदणी; चमचमता चंद्र
*माग मला
देईन तुला*
नको मागू
इंद्रासारखं दान कधी
कर्णाकडं मागू नको...

दिवस माग; रात्र माग
सूर्यावरचे डाग माग
घासातला घास अन्
श्वासातला श्वास माग
*माग मला
देईन तुला*
नको मागू
इंद्रासारखं दान कधी
कर्णाकडं मागू नको...

कवीकडं कवितेचं
दान कधी मागू नको...

Monday, December 12, 2011

जाता जाता

जाता जाता 
देऊन जा...
उरलेलीही सारी दुःखं
विसरलेले ते शाप
राहून गेलेले ते डाग

जाता जाता 
देऊन जा...
तोच संताप
तीच जळजळ
विसरू पाहे 
विसरत नाही; 
ओल्या पानांची ती सळसळ


जाता जाता 
देऊन जा...
मालवलेले सारे दिवे
ओंजळीतला अंधारही
न जाणो, उजेडानं 
दिपल्या डोळ्यांना 
होईल कधी आधारही


कुठला जन्म? कुठलं देणं?
दिलं तरी फिटत नाही...
एका जन्मी खुप दिलंस
पुन्हा जन्म घेववत नाही...


जाता जाता 
देऊन जा...
दिलेलंही सारं काही...

Monday, October 24, 2011

मी कसं जगतो...?

जगावं कसं वगैरे शिकवावं लागतं, यावर आपला अजिबात विश्वास नाही. आपण म्हणजे मी. स्वतःला किंचित आदरानं वागवतो. खूपदा लोकं विचारतात, की का बाबा, तुला टेन्शन कसं येत नाही? मी किंचित हसतो. प्रश्न उडवून लावतो. टेन्शन घेणं नं घेणं हा च्याचा त्याचा प्रश्न, असं उत्तर देतो. मला खूप छोट्या गोष्टींत आनंद शोधता येतो. म्हणजे जगावं कसं हे दुसऱयांकडून शिकावं लागत नाही. अर्थातच, हे शिकणं आपल्याला मान्य नाही, हे आधीच सांगितलं आहे.

माझा एक मित्र आहे. बाईकवर मागं बसला, तर त्याच्या हाताची बोटं खांद्यात रुतत राहतात. मी बाईक धड चालवतोय की नाही, याची त्याला काळजी. समोर ऑटो आली अचानक तर ब्रेकच्या आधी याची बोटं खांद्यात घट्ट रुतलेली लक्षात येणार, इतकी काळजी त्याला. थंडीत स्वेटर-कानटोपी, मफलर इत्यादी. उन्हाळ्यात कॅप, मास्क इत्यादी. पावसाळ्यात छत्री, रेनकोट इत्यादी. असं याचं जगणं. वय वर्ष 35. उन्हाळ्यात मस्त उंडारावं आणि पावसाळ्यात पावसात मनसोक्त भिजावं आणि थंडीत दुलईत xxx वर करून तासनं तास लोळत पडावं म्हणजे जगणं हे कधी कळत नाही त्याला. मग विचारत बसतो, की का रे बाबा, टेन्शन कसं येत नाही तुला?

टेन्शन न घेणं हा काही गुन्हा नाही. मला तर वाटतं, टेन्शन घेणं हाच एक गुन्हा आहे. अरे, सालं ही नोकरी-धंदा करतो कशासाठी आपण? चांगलं जगता यावं म्हणूनच नं? मग तेच जमत नसेल, तर काय अर्थ आहे या जगण्याला, असा प्रश्न आपण आपल्याशीच कधी विचारत नाही, यात खरी मेख आहे. काय आहे, काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहिती असतात. ती मिळाली, तर मग पुढं काय करायचं, हा आणखी एक उपप्रश्न असतो. त्यामुळं प्रश्नच विचारत सुटायचे, उत्तराकडं ढुंकूनसुद्धा पाहायचं नाही, अशी आपली प्रवृत्ती बनते. ही प्रवृत्ती म्हणजे टेन्शन. स्वतःला आलंय असं वाटलं, की दुसऱयाला विचारत सुटतो आपण...


असो. वाचून सोडून द्या. खूप दिवस काहीच लिहिलं नाही, म्हणून आज बडवत बसलो ;)