Friday, May 7, 2010

आजच्या दिवसापुरतं अध्यात्म...

आता जे काही झालंय, ते होऊ दे. त्याचा विचार आता नको. आता पुढचा विचार करू. घडलं, ते हातात नव्हतं. घडणार आहे, ते बदलणं हातात आहे. मग घडून गेलं, त्याचा विचार किती आणि का करायचा? नाही का?

थोडंसं अध्यात्मिक वाटेल. बुवाबाजी नव्हे. अध्यात्मिक. आणि अध्यात्मिकता जड-बोजड नसते. आत्म्याशी रिलेटेड असते. आत्मा असतो का नसतो, हे वाद जाऊ दे खड्ड्यात. हायपोथेटिकली आत्मा आहे, असं धरूया. या आत्म्याला ठेच लागेल, त्याला दुःख पोहोचेल, ते वाईट. ते घडलं. आत्म्याला ठेच लागली. आता पुढं काय...? ही ठेच कवटाळून बसायचं की खपली धरू पाहायची? खपली धरू पाहायची तर झालं, ते न विसरता पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. परत ठेचकाळता कामा नये, हे लक्षात ठेवलं पाहिजे.

हे बघ, माझं अध्यात्म हे अध्यात-ना-मध्यात असं नाहीय. मला, माझ्या आत्म्याला, जे पटेल, ते करणं म्हणजे अध्यात्म. त्याला पटत नसताना जे जे करावं लागतं, एक प्रोफेशन म्हणून, ते ते शक्यतो रिपीट न करणं, म्हणजे मानसिक शांती, ही सोपी व्याख्या.

तुला पटली, तर वापरून बघ. नाहीतर दे फेकून. तुझाही आत्मा असेलच ना? की तोही विकायचा विचार आहे आता? किंचित परखड वाटेल. किंचितच. पण, ते बोललं पाहिजे. जगतो कशासाठी रे आपण? फक्त पैशासाठी का? मग तुझा श्वास ठेवतो नं दाबून. त्याएेवजी देतो पैसे. चालेल का? किंवा असं कर पुढचे वर्षभर तोंडावर हासू येता कामा नये. रडवा, सुतकी चेहरा करून बस. त्याएेवजी देतो पैसे. चालेल का? एकदाही तुझ्या चेहऱयावरची सुरकुती हालता कामा नये बघ.

अरे, खूपशा गोष्टी आहेत जगात. ज्यांची 'किंमत' पैशात नाही करता आलेली अजून. अॅडम स्मिथला देखील करता आली नाही. मार्क्सचा तो विचार होता. त्यालाही झेपलं नाही. प्रत्येक गोष्टींची किंमत पैशात होत नसते...

झाल्या गोष्टींचा विसर पडू न देता नव्या शिक. पैशाशिवाय जगात अनेक गोष्टींना असते ती किंमत समजून घे.

आजच्या दिवसापुरतं बास झालं...!