Thursday, March 25, 2010

दादा का खवळलं...?

आता दादा जाम खवळलं.
'च्यायला, हे त्या बेण्याचं काम असणार...बंदोबस्त कराय पाह्यजे.'
दादांच्या डोळ्यासमोर फक्त दाढी होती.
'गळ्यात गळे घाल्तोय आणि इकडं हात मारतो...'
दादा विचारात बुडाले.
पुण्याचं काहीतरी सहारानं घेतलं हे दाढीचंच काम, हे दादांनी पक्क मनावर घेतलं.
'पुण्याचं काहीही कोणीतरी दुसराच घेतोय म्हंजे काय? आपला वट कमी झाला की काय...?' दादांच्या मनात शंकेनं ठाण मांडलं.
झालं. दादांनी खबरे सोडले, सहारावर पहारा आणि दाढीतल्या केसांची खबर पाह्यजे म्हणून.
पाह्यजे म्हंजे पाह्यजेच.
भागातले वट्ट पैलवान निवडून निवडून दादांनी दम देऊन आणि दम भरून दिले पाठवून.
या पैलवानांनी दादांना सादर केलेला रिपोर्ट:
१. महुंजेतली जागा आपल्या हातनं जाणार. दाढीनं कायतरी केलंय. तिथं बाहेरची पोरं आणून बशिवणार. जागा मोठ्ठी हाय. दोन-चार टाऊनशीप विस्कटल्या असत्या. हातनं गेल्या.
२. पिंपरीच्या हद्दीतल्या हॉटेलवाल्यांना धरलं पाहिजे. त्यांच्याकडं गर्दी होणार. त्यांची फी वाढवायला लागणार. म्हापौरांशी बोललं पाह्यजेल.
३. शिलाईचं काम बाहेर गेलं. मतदारसंघात काय मिळणार नाय.
४. टॅंकरचं काम बाकीय. त्यावर हात मारायला पाह्यजेल.
५. दाढीचंच काम ह्ये सगळं. आपल्या पायात पाय घाल्तंय ते. आपल्या कबड्डीला रुप्पया दिला नव्हता त्यानं. फुक्टात घशात घातलीय त्यानं आपली जागा दुसऱयाच्या. सोडला नाय पाह्यजेल.
६. नोकऱयांचं काय जमणार नाह्ये इथ्थे. खाऊन संपवलंय सग्ळं.

(दादा सारखं भविष्याचं सांगत असतात. काय करायला पाह्यजे, एवढं सांगा, हा दादांचा आदेश. काय चाललंय, ते दिसतंय की, असं त्यांचं मत.)

Tuesday, March 16, 2010

'हॉर्न टेस्ट' आणि स्वभावविशेष

भर उन्हात सिग्नलला ट्रॅफिकने चोंदून भरलेल्या चौकात शांत मनानं उभं राहणं अशक्य नाही...!

हा प्रयोग केला आणि तो भलताच सक्सेस झाला. नवीन शोध लागला. या अशा वातावरणात एक संगीत असतं आणि या संगीतावरून अनोळखी व्यक्तींच्या स्वभावाचा अंदाज बांधता येतो...!!

पटत नाही?

ही 'हॉर्न टेस्ट' म्हणा वाटल्यास.

कोण कसा हॉर्न वाजवतोय, हॉर्नचं बटण कितीदा किती अस्वस्थतेनं पिळतोय, यावरून त्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज करणं सोप्पं आहे.

या काही टीप्स:
१. सिग्नलला सगळ्यात शेवटी असूनही पीर्र पीर्र पीर्र किंवा क्विक् व्किक् क्विक् करत उभा असणारा किंवा असणारी व्यक्ती ही नेहमी स्वतःला असुरक्षित समजत असते. आपल्याला एकटे टाकून सगळे निघून जातील, या भीतीनं लहान मुल जसं किरकिरतं तशा असतात या व्यक्ती.

२. लेनमधून सगळी वाहनं सावकाश जाताहेत. अशावेळी प्रत्येक वाहनाच्या मागं जाऊन ओव्हरटेक करण्यापूर्वी टीर्र टीर्र टीर्र असा हॉर्न देत जाणारी व्यक्ती ही बहुदा एच.आर. किंवा व्यवस्थापन क्षेत्राच्या लायकीची. प्रत्येकाचं लक्ष वेधत पुढं जाण्याची तिची किंवा त्याची खोड.

३. सुस्साट वेगानं जाताना हॉर्नवरचं बोट क्षणभरही न काढणारी व्यक्ती ही पुढारीपणाचा आव आणणारी जाणावी. सगळ्यांच्या पुढं, सगळ्यात पुढं तेही गावभर बोंबलत. हा असतो या व्यक्तीचा स्वभावविशेष.

४. पाचशे मीटर अंतरावर ट्रक असला, तरी दर सेकंदाला हॉर्न देत कोणी निघाला किंवा निघाली असेल, तर समजा की ही व्यक्ती बँकेत, एलआयसीत किंवा सरकारी नोकरीत आहे. अतिशय सुरक्षित जगायचं असतं अशांना.

५. कुठूनतरी लयबद्ध हॉर्न एेकू येतो. टीटीट्टीटी टीटीट्टीटी टीटीट्टीटी असा अगदी सुरात. अशी माणसं मार्केटिंगमध्ये यशस्वी होऊ शकणारी. क्वचित संगीताचीही आवड असलेली. जे काही करायचं, ते सुरात. स्वतःची छाप उमटवत. असा त्यांचा खाक्या. त्यांचे कपडेही झकपक असतात बहुतेकवेळा.

६. पिळका आणि वाजला न वाजला असा हॉर्न एेकला, तर समजा की माणूस घाबरट, जपून जगणारा, कुणाच्या अध्यात न मध्यात आयुष्य काढणारा असा आहे.

७. सिग्नलला किंवा कुठेही सगळी वाहने शांत उभी आहेत. आणि अशावेळी मागून हॉर्न वाजवत पुढं घुसण्याचा प्रयत्न कोणीतरी करतेय. तो हॉर्न एेका. कीर्रकीर्रर रीर्र कीर्रकीर्रर रीर्र असा सूर असेल. या व्यक्तींना पुढं पुढं करण्याची हौस फार. बारसं ते बारावं अशा कुठल्याही कार्यात या व्यक्ती हिरहिरीनं पुढाकार घेतात.

८. लहान तोंडी मोठा घास अशी एक मराठी म्हण आहे. नको तिथं नको ते बोलण्याची काहींना खोड असते. बढाया मारण्याचा स्वभाव हा. ट्रकसाठीचा हॉर्न बाईकला बसवून रस्ते दणाणून सोडणाऱया व्यक्ती या अशा प्रकारातल्या.

आणखीही काही स्वभावविशेष तुम्हालाही उमगले, तर मलाही सांगा...!!

Tuesday, March 9, 2010

'हे वेळ घालवणं नाहीय...'

ऑस्करचा सोहळा सोमवारी टीव्हीवर डोळे भरून पाहिला. मला मनापासून आवडतो हा सोहळा. 'अॅन्ड द विनर इज्'चा आवाज लॉस एंजल्सच्या त्या खचाखच सभागृहात घुमता क्षणी होणारा टाळ्यांचा कडकडाट...त्यानंतर येणारा भावनांचा पूर...हे सारं काही पाहण्यासारखंच असतं. अनुभवण्यासारखंच असतं.

यंदाच्या सोहळ्यातलं एक भाषण माझ्या मनावर ठसलं. अगदी खोलवर रुतलं. म्हणून ही पोस्ट.

मायकेल गियाच्चिनो याला 'अप' चित्रपटातील सर्वोत्तम म्युझिकबद्दल (ओरिजिनल स्कोअर) ऑस्कर मिळालं. त्यानं ऑस्करची बाहुली स्विकारताना पन्नास-साठ सेकंदात मांडलेले विचार जगभरातल्या पालकांना, भल्या-भल्या शिक्षण तज्ज्ञांना आत्मचिंतन करायला लावणारे आहेत.

मायकेल म्हणाला...
'मी नऊ वर्षांचा होतो, तेव्हा बाबांना विचारलं, 'तुमचा मुव्ही कॅमेरा मला मिळेल? तुमच्या ड्रॉवरमधला तो जुना कॅमेरा..?' बाबा म्हणाले,'नक्की. घेऊन टाक.' मी तो कॅमेरा घेतला आणि मुव्हीज् बनवायला सुरूवात केली. शक्य तितकी नवनिर्मिती करण्याचा माझा प्रयत्न होता. आणि आयुष्यात एकदाही माझे आई-बाबा मला म्हणाले नाहीत, की अरे, हे काय करतोयस? कशाला वेळ घालवतोयस...?. नाही. एकदाही असं म्हणाले नाहीत. मी मोठा झालो. मला शिक्षक मिळाले. सहकारी मिळाले. अशी लोक मिळाली, ज्यांनी एकदाही माझ्या कामाला, 'वेळ घालवणं' म्हटलं नाही...त्यामुळं जे काही मी करत गेलो, ते माझ्यासाठी अगदी ओके होतं. या जगात अशी अनेक चिमुकली आहेत, ज्यांना ही सपोर्ट सिस्टिम नाहीय. त्यांच्यासाठी मी सांगतोय. तुम्ही मला एेकत असाल, तर लक्षात ठेवा. तुम्हाला नवनिर्मिती करायची असेल, तर उठा आणि काम सुरू करा. हे 'वेळ घालवणं' नाहीय...करून पाहा. ओके?'

मायकेलचं हे भाषण कोरून ठेवावं असं आहे.

Saturday, March 6, 2010

निखळ आनंददायी...बुक थेरपी

खूप छान कविता वाचली, की मन प्रसन्न होतं.
ग्रेसच्या एखाद्या ओळीचा नव्यानं अर्थ उलगडला की छान वाटू लागतं.
नेमाडे, गौरी देशपांडे यांच्यासारखं कोणी हाताला लागलं, तर पुस्तक पूर्ण संपवूनच उठावसं वाटतं.
आठ-पंधरा दिवस काहीच नवं वाचलं नाही, तर अस्वस्थ होऊ लागतं.
एखादी गोष्ट मनात इतकी साठून राहते, की लिहून काढल्यावरच चैन पडतं...

हे काय आहे? असं का होतं...?

परवा सर्फिंग करताना मिळाली या प्रश्नांची उत्तरं. मी काटेकोर डॉक्टर टाळणारा. शक्यतो डॉक्टरची पायरी नकोच, या मताचा. तरीही अॅलोपथीपासून म्युझिक थेरपीपर्यंत काही ना काही गोष्टींची किमान माहिती आहे. सामान्य ज्ञान म्हणा हवं तर.

पण, नव्हती ती 'बुक थेरपी'ची माहिती.

अशी थेरपी खरेच आहे. बुक थेरपी. विशेषतः मानसोपचारातील ही महत्वाची पद्धती आहे. गोंधळलेल्या विद्यार्थ्यांना मार्गावर आणण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. अर्थातच, मला मिळालेल्या लिंकवर आणि त्यानंतर केलेल्या सर्चमध्ये बुक थेरपी अधिकाधिकरित्या शालेय विद्यार्थ्यांसाठी वापरण्याबद्दल मार्गदर्शन होतं. तरीही, ही थेरपी आपणही अधून मधून स्वतःच्या नकळत वापरत आहोतच, हेही हळू हळू लक्षात येत होतं.

कंटाळलेल्या, मरगळलेल्या मनाला उभारी आणण्याचं काम प्रेरणादायी पुस्तकं करू शकतात. निराश झालेल्या मनांमध्ये आशेची ज्योत पुस्तकं करू शकतात. अडचणींवर मात करण्याचं कसब पुस्तकांतून मिळविता येतं. आव्हानांना सामोरं जाण्याचं धैर्य पुस्तकातून हाती येतं. दुखावलेल्या मनावर फुंकर पुस्तकं घालू शकतात. डोक्यात घट्ट घुसून घर केलेल्या ताणाला झटक्यात पळवून लावण्याचं कामही पुस्तकंच करू शकतात...

बुक थेरपीचे असे अनेक फायदे.
साईड इफेक्टस् शून्य.

मग जाणवलं, 'रामायण', 'महाभारत', 'ज्ञानेश्वरी', 'तुकाराम गाथा' ही या बुक थेरपीचीच पुरातन रुपं. या महाकाव्यांनी कित्येक पिढ्यांना प्रेरणा दिली. उभारी दिली. शांती दिली. हसवलं. विचारांना चालना दिली आणि रस्ताही दाखवला...

आजही काय वेगळे आहे? आवडलेल्या पुस्तकात आपण रमून जातो, म्हणजे होतं तरी काय? ध्यानच लागतं नं आपलं? सारं काही विसरून एखाद्या पुस्तकात असं रमून जाणं हे आपल्या मनावर होत असणारे उपचार तर असतात. मनाला पुन्हा ताजंतवानं करणारे...

बुक थेरपी ही अशी पुनःपुन्हा वापरून पाहावी अशी असते...

Friday, March 5, 2010

पगारवाढीच्या प्रतिक्षेतल्या कर्मचाऱयांसाठी...!!!

तमाम कर्मचारी वर्गासाठी मार्चमध्ये अत्यंत उपयुक्त:



Thursday, March 4, 2010

बाप होण्यात सुख आहे...

बाप होण्यात सुख आहे. मुल लहान असताना त्याच्या वाढीत भाग घेण्यात खरंच सुख आहे. हो, एखादा क्षण येतो, की 'काय हे कार्ट दंगा करतंय,' असं वाटतं. तिरमीरीत क्वचित हातही उगारला जाईल. पण, त्याच्या चिमुकल्या लुकलुकत्या डोळ्यात पाहिलं, की हात थिजेल. रागात उचललाच हात, तर तो मऊसूत गालावर मुलायम फिरेल...
...बाप होण्यात हे सुख आहे.

माझ्या पिल्लूशी मी रोजच नाही खेळू शकत. खूपदा होतं असं की मी पोहोचतो, तेव्हा तो पेंगुळलेला असतो. तरीही उठतो आणि गुदगुदल्यांना गुदगुदल्यांनीच प्रतिसाद देतो! त्याचं खळखळून हसणं बारा-चौदा तासांचा ताण कुठंच्या कुठं पळवून लावतं. अगदी अगलद पळवून लावतं....
...बाप होण्यात हे सुख आहे.

त्याचं निरागस प्रश्न विचारणं आणि विश्वासानं खांद्यावर झोपून जाणं केवढातरी आत्मविश्वास देते. 'त्याला चंदामामा म्हणायचं, तर तो आईचा भाऊ ना रे? मग आई इथं आणि तो तिथं कसा रे?', असल्या प्रश्नाला उत्तर देताना बाबाची उडालेली भंबेरी त्याला कधी कळत नाही...! त्याला कधीच हे माहिती नसतं, की आपल्या अशा कृतीतूनच बाबाला मिळतेय उर्जा...बाप होण्यात हे सुख आहे.

त्याला टाईम मॅनेजमेन्ट, स्ट्रेस मॅनेजमेन्ट, शेड्युल वगैरे वगैरे शब्द अजिबात ठावूक नाहीत. तरीही, बाबाबरोबर मिळालेला वेळ जास्तीज जास्त एन्जॉय कसा करायचा, हे त्याला समजलंय. कुणीही न शिकवता. ही उपजत समज त्याला कुठून आली, हा प्रश्न तो झोपला की नेहमी पडतो. भणाणारं आणि ऑफिसच्या विचारानं शिणलेलं डोकं मस्त शांत करून जाणारा पिल्लूचा सहवास...
...बाप होण्यात हेच खरं सुख आहे.

Monday, March 1, 2010

सूर्यास्ताचा अटळ उत्सव...


सूर्यास्त मला नेहमी कासावीस करतो.

हुरहूर लावतो.

काहीतरी हातातून निसटतंय, आयुष्यातून दूर चाललंय ही भावना सूर्यास्ताच्या क्षणी मनात घर करू लागते. पश्चिम क्षितिजापासून हातभरावर सूर्यगोल आला, की मी नदीच्या त्या उंच टेकाडावर विसावतो. ही माझी आवडती जागा. सूर्यास्ताचा अटळ उत्सव पाहण्याची. या उत्सवाची रेघ न् रेघ आणि कण न् कण मनात साठवायची आस लागते. आभाळात पांढुरक्या ढगांची दाटी असेल, तर सूर्यास्त म्हणजे रंगांचा सोहळा बनतो. लाल-तांबड्या रंगाच्या अक्षरशः अगणित छटांचा मनसोक्त कॅनव्हास होतो. नारिंगी, केशरी, भगव्याची उधळण सुरू होते.
पाहता पाहता तेजोगोल डोंगराआड जायला लागतो.

कासावीसपणा सुरू होतो, तो इथं.

त्याचं इंच-इंचानं डोंगराआड रुतत जाणं मनांत विलक्षण कालवाकालव सुरू करतं.
आता एक कोर तेवढी राहलीय. दिवसाच्या प्रकाशाची ही शेवटची खूण. आभाळ रंगांनी न्हावून गेलंय आणि ही कोर सगळं काही आवरून जायच्या तयारीत आहे. ती कोर दिसेनाशी झाली की एक हलकीशी थंडगार झुळूक नदीवरून सुटते. जणू काही, 'सूर्य गेला...' हा सांगावा आणते. झुळूक नव्हेच ती. ती तर कुजबूज...त्याचक्षणी आकाशात एक काळीभोर रेघ उमटू लागते. हळू हळू ही रेघ पुढं पुढं जाऊ लागते. वटवाघळांचं चित्कारणं मधूनच कानावर पडायला लागतं. प्रकाशाचा पसारा आटपू लागतो, तसं आकाशभर या भेसूर पक्ष्यांची दाटी व्हायला लागते. कुठंतरी दूरवर त्यांचा प्रवास सुरू झालेला असतो.
नदीत अर्ध्याअधिक बुडून बसलेल्या म्हशी या अंधारयात्रींच्या चाहुलीनं अंग झटकत बाहेर पडू लागतात. आपापल्या गोठ्यांच्या दिशेनं न बोलता त्यांची चाल सुरू होते.
सारेजण परतीच्या प्रवासाला लागतात. मुक्कामाच्या प्रवासाला.

ही सारी कातरवेळ. करकरीत तिन्हीसांज.

सूर्य बुडालेला. अंधार अजून कब्जा करायचाय. आकाशात वटवाघळं. आसमंत शांत. मन कातरतं. आठवणींनी व्याकूळ होतं. कुणाच्या कुणाच्या आठवणींची दाटी मनात व्हायला लागते. सुटलेला हाताचा स्पर्श नेमका हाच क्षण पकडून जाणवायला लागतो...एकानंतर दुसरी. दुसऱयात तिसरी..त्यातच गुंतलेली चौथी...आठवणींची अनंत साळखी ओवली जाऊ लागते...
'उद्या परत हाच सूर्यास्त आहे. असाच आहे अगदी,' असं कॉन्शस मन कुठंतरी करवादत असतं. पण, सबकॉन्शस ते काही एेकायला तयार नसतं. आठवणी आणि आठवणी. गुदमरायला होतं. त्यातून सुटायसाठी तडफड सुरू होते. प्रत्येक तडफड आठवणींचा कासरा अधिकच आवळते. कासावीसपण तीव्र होऊ लागतं. डोळे घट्ट मिटले, तरी ओघळणारा अश्रू फट शोधून बाहेर येतो...
निग्रहानं डोळे उघडू लागलो, की अंधारलेलं दिसू लागतं. मनाचा हिय्या करून उठतो. सबकॉन्शसचं भूत आता उतरू लागलेलं असतं. मनाला आलेला थकवा जाणवू लागतो. पाय उचलून घराची वाट धरतो...सूर्यास्ताचा अटळ उत्सव मनावरची पकड सैलावतो. गल्लीपर्यंत पोहचेतो कॉन्शस झालेला असतो. शांतपणा परतलेला असतो...

सूर्यास्ताचा अटळ उत्सव असं मनाला उलथंपालथं करतो. खळबळून काढतो. तरीही हवासा वाटतो....

म्हणूनच तर दुसऱया दिवशी बरोबर त्याच टायमिंगला मी त्याच जागी आलेलो असतो...