Monday, March 1, 2010

सूर्यास्ताचा अटळ उत्सव...


सूर्यास्त मला नेहमी कासावीस करतो.

हुरहूर लावतो.

काहीतरी हातातून निसटतंय, आयुष्यातून दूर चाललंय ही भावना सूर्यास्ताच्या क्षणी मनात घर करू लागते. पश्चिम क्षितिजापासून हातभरावर सूर्यगोल आला, की मी नदीच्या त्या उंच टेकाडावर विसावतो. ही माझी आवडती जागा. सूर्यास्ताचा अटळ उत्सव पाहण्याची. या उत्सवाची रेघ न् रेघ आणि कण न् कण मनात साठवायची आस लागते. आभाळात पांढुरक्या ढगांची दाटी असेल, तर सूर्यास्त म्हणजे रंगांचा सोहळा बनतो. लाल-तांबड्या रंगाच्या अक्षरशः अगणित छटांचा मनसोक्त कॅनव्हास होतो. नारिंगी, केशरी, भगव्याची उधळण सुरू होते.
पाहता पाहता तेजोगोल डोंगराआड जायला लागतो.

कासावीसपणा सुरू होतो, तो इथं.

त्याचं इंच-इंचानं डोंगराआड रुतत जाणं मनांत विलक्षण कालवाकालव सुरू करतं.
आता एक कोर तेवढी राहलीय. दिवसाच्या प्रकाशाची ही शेवटची खूण. आभाळ रंगांनी न्हावून गेलंय आणि ही कोर सगळं काही आवरून जायच्या तयारीत आहे. ती कोर दिसेनाशी झाली की एक हलकीशी थंडगार झुळूक नदीवरून सुटते. जणू काही, 'सूर्य गेला...' हा सांगावा आणते. झुळूक नव्हेच ती. ती तर कुजबूज...त्याचक्षणी आकाशात एक काळीभोर रेघ उमटू लागते. हळू हळू ही रेघ पुढं पुढं जाऊ लागते. वटवाघळांचं चित्कारणं मधूनच कानावर पडायला लागतं. प्रकाशाचा पसारा आटपू लागतो, तसं आकाशभर या भेसूर पक्ष्यांची दाटी व्हायला लागते. कुठंतरी दूरवर त्यांचा प्रवास सुरू झालेला असतो.
नदीत अर्ध्याअधिक बुडून बसलेल्या म्हशी या अंधारयात्रींच्या चाहुलीनं अंग झटकत बाहेर पडू लागतात. आपापल्या गोठ्यांच्या दिशेनं न बोलता त्यांची चाल सुरू होते.
सारेजण परतीच्या प्रवासाला लागतात. मुक्कामाच्या प्रवासाला.

ही सारी कातरवेळ. करकरीत तिन्हीसांज.

सूर्य बुडालेला. अंधार अजून कब्जा करायचाय. आकाशात वटवाघळं. आसमंत शांत. मन कातरतं. आठवणींनी व्याकूळ होतं. कुणाच्या कुणाच्या आठवणींची दाटी मनात व्हायला लागते. सुटलेला हाताचा स्पर्श नेमका हाच क्षण पकडून जाणवायला लागतो...एकानंतर दुसरी. दुसऱयात तिसरी..त्यातच गुंतलेली चौथी...आठवणींची अनंत साळखी ओवली जाऊ लागते...
'उद्या परत हाच सूर्यास्त आहे. असाच आहे अगदी,' असं कॉन्शस मन कुठंतरी करवादत असतं. पण, सबकॉन्शस ते काही एेकायला तयार नसतं. आठवणी आणि आठवणी. गुदमरायला होतं. त्यातून सुटायसाठी तडफड सुरू होते. प्रत्येक तडफड आठवणींचा कासरा अधिकच आवळते. कासावीसपण तीव्र होऊ लागतं. डोळे घट्ट मिटले, तरी ओघळणारा अश्रू फट शोधून बाहेर येतो...
निग्रहानं डोळे उघडू लागलो, की अंधारलेलं दिसू लागतं. मनाचा हिय्या करून उठतो. सबकॉन्शसचं भूत आता उतरू लागलेलं असतं. मनाला आलेला थकवा जाणवू लागतो. पाय उचलून घराची वाट धरतो...सूर्यास्ताचा अटळ उत्सव मनावरची पकड सैलावतो. गल्लीपर्यंत पोहचेतो कॉन्शस झालेला असतो. शांतपणा परतलेला असतो...

सूर्यास्ताचा अटळ उत्सव असं मनाला उलथंपालथं करतो. खळबळून काढतो. तरीही हवासा वाटतो....

म्हणूनच तर दुसऱया दिवशी बरोबर त्याच टायमिंगला मी त्याच जागी आलेलो असतो...

1 comment:

  1. That is because you consider sun as a material thing which had a beginning and must have an end. Just consider it as a source and you will see that there is no reason to be sorry.

    ReplyDelete