Monday, April 19, 2010

भाकड महिन्याचे लिखाण

हा महिना खूप भाकड जातोय. म्हणजे खूपसं मनात साचतंय, पण लिहायलाच होत नाहीय. हे म्हणजे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशा जाहिरातीसारखं झालंय.

होऊ दे.

आज प्रयत्न करणार आहे. नेटानं. अख्खा महिना भाकड म्हणजे काय? असं नको व्हायला. माझ्यापेक्षा जास्त काम शशी थरूरला नक्कीच होतं. तरीही बेट्यानं ट्विटींग नेटानं केलं. खड्ड्यात गेला, तरी नेट काही कमी पडला नाही. तर मला त्याच्यापेक्षा कमी काम नक्कीच आहे. त्यामुळं आजपासून परत काहीतरी लिहायचं हे नक्की.

आता बघता बघता इतकं तर लिहून झालंच की. दिसामाजी काही लिहित जावे, हे काही सोपं नाही, हे लक्षात येतं. पेपरवाले दिवसचे दिवस इतकं लिखाण कसं पाडतात कोण जाणे.

बरं झालं, पेपरमध्ये नाही गेलो ते. नाहीतर लिहून लिहून माझाच किस पडला असता. आणि ते काही आपल्याला झेपलं नसतं. म्हणजे उगाच राजकीय भोंदूगिरी करावी लागली असती. किंवा नसतीही. तरीही ते काही आपल्याला जमलं नसतं.

नाही जमलं, तर बरंच झालं की.

पण, मला हा नेहमी प्रश्न पडतो, की आपण लिहितो कशासाठी? लिहिणं ही उर्जा आहे का?

किती विचित्रं आहे नाही?

उर्जेचा नियम असा, की ती वापरली की कमी होते.

लिखाणाबाबत उलट. ते एकदा का मनातनं बाहेर टाकलं, की आणखी तयार व्हायला जागा होते. रिचार्ज म्हणा वाटल्यास.

म्हणून बहुदा आपण लिहितो.

पण, लिहितो तेही छानच. हा एक मोठा फरक आहे, आपल्यात आणि प्राण्यांमध्ये. तशी अनेक साम्यं आहेत आपल्यात आणि प्राण्यांत. पण, फरक करायला गेलो, तर जरा अवघड होतं. फरक खूप कमी मिळतात...!!

जाऊ दे.

भाकड महिन्यात काही तरी भाकड लिहिण्यापेक्षा थांबलेलं बरं...

No comments:

Post a Comment