Tuesday, March 16, 2010

'हॉर्न टेस्ट' आणि स्वभावविशेष

भर उन्हात सिग्नलला ट्रॅफिकने चोंदून भरलेल्या चौकात शांत मनानं उभं राहणं अशक्य नाही...!

हा प्रयोग केला आणि तो भलताच सक्सेस झाला. नवीन शोध लागला. या अशा वातावरणात एक संगीत असतं आणि या संगीतावरून अनोळखी व्यक्तींच्या स्वभावाचा अंदाज बांधता येतो...!!

पटत नाही?

ही 'हॉर्न टेस्ट' म्हणा वाटल्यास.

कोण कसा हॉर्न वाजवतोय, हॉर्नचं बटण कितीदा किती अस्वस्थतेनं पिळतोय, यावरून त्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज करणं सोप्पं आहे.

या काही टीप्स:
१. सिग्नलला सगळ्यात शेवटी असूनही पीर्र पीर्र पीर्र किंवा क्विक् व्किक् क्विक् करत उभा असणारा किंवा असणारी व्यक्ती ही नेहमी स्वतःला असुरक्षित समजत असते. आपल्याला एकटे टाकून सगळे निघून जातील, या भीतीनं लहान मुल जसं किरकिरतं तशा असतात या व्यक्ती.

२. लेनमधून सगळी वाहनं सावकाश जाताहेत. अशावेळी प्रत्येक वाहनाच्या मागं जाऊन ओव्हरटेक करण्यापूर्वी टीर्र टीर्र टीर्र असा हॉर्न देत जाणारी व्यक्ती ही बहुदा एच.आर. किंवा व्यवस्थापन क्षेत्राच्या लायकीची. प्रत्येकाचं लक्ष वेधत पुढं जाण्याची तिची किंवा त्याची खोड.

३. सुस्साट वेगानं जाताना हॉर्नवरचं बोट क्षणभरही न काढणारी व्यक्ती ही पुढारीपणाचा आव आणणारी जाणावी. सगळ्यांच्या पुढं, सगळ्यात पुढं तेही गावभर बोंबलत. हा असतो या व्यक्तीचा स्वभावविशेष.

४. पाचशे मीटर अंतरावर ट्रक असला, तरी दर सेकंदाला हॉर्न देत कोणी निघाला किंवा निघाली असेल, तर समजा की ही व्यक्ती बँकेत, एलआयसीत किंवा सरकारी नोकरीत आहे. अतिशय सुरक्षित जगायचं असतं अशांना.

५. कुठूनतरी लयबद्ध हॉर्न एेकू येतो. टीटीट्टीटी टीटीट्टीटी टीटीट्टीटी असा अगदी सुरात. अशी माणसं मार्केटिंगमध्ये यशस्वी होऊ शकणारी. क्वचित संगीताचीही आवड असलेली. जे काही करायचं, ते सुरात. स्वतःची छाप उमटवत. असा त्यांचा खाक्या. त्यांचे कपडेही झकपक असतात बहुतेकवेळा.

६. पिळका आणि वाजला न वाजला असा हॉर्न एेकला, तर समजा की माणूस घाबरट, जपून जगणारा, कुणाच्या अध्यात न मध्यात आयुष्य काढणारा असा आहे.

७. सिग्नलला किंवा कुठेही सगळी वाहने शांत उभी आहेत. आणि अशावेळी मागून हॉर्न वाजवत पुढं घुसण्याचा प्रयत्न कोणीतरी करतेय. तो हॉर्न एेका. कीर्रकीर्रर रीर्र कीर्रकीर्रर रीर्र असा सूर असेल. या व्यक्तींना पुढं पुढं करण्याची हौस फार. बारसं ते बारावं अशा कुठल्याही कार्यात या व्यक्ती हिरहिरीनं पुढाकार घेतात.

८. लहान तोंडी मोठा घास अशी एक मराठी म्हण आहे. नको तिथं नको ते बोलण्याची काहींना खोड असते. बढाया मारण्याचा स्वभाव हा. ट्रकसाठीचा हॉर्न बाईकला बसवून रस्ते दणाणून सोडणाऱया व्यक्ती या अशा प्रकारातल्या.

आणखीही काही स्वभावविशेष तुम्हालाही उमगले, तर मलाही सांगा...!!

6 comments:

  1. हे..हे..हे...भारीच बरं!

    ReplyDelete
  2. Sahiye..... Akshare aani sahyan warun swabhav olakhatat aatta he ajun ek navin tantr.... mastach :)

    ReplyDelete
  3. मस्तच लिहिलय.
    स्वभाव वैशिष्ठ्य छान टिपली आहेत.

    ReplyDelete
  4. मग होर्न न वाजवणारी मनसे कशी असतात?? नीरस?? की ह्या सर्व व्यक्तींचे स्वभावविशेष नोंदवणारी...!!!

    ReplyDelete
  5. आनंद, मैथिली आणि अनिकेत: धन्यवाद; रोहन: अगदी मान्य. खरंतर एकूण १२ वैशिष्ट्यं होती. त्यातली आठच लिहिता आली. आणखी चार नक्कीच आहेत. त्यामध्ये 'मौनी हॉर्न' आहेच...!!!

    ReplyDelete
  6. छान ! आवडली ही स्वभाव वैशिष्ठ्ये !पुढचे चार प्रकार पण लिहा ना?
    savadhan.wordpress.com

    ReplyDelete