Saturday, February 20, 2010

म्हातारी तिथंच सुखी आहे...

परवा बोलता बोलता म्हातारी म्हणाली, आता दिस किती उर्ले रं माझं? राहू दे की सुखानं हितंच...

एक जुनाट घर. पडकं म्हटलं तरी चालेल. जोराचा पाऊस आला, तर गळत्या ठिकाणी लावायला भांड्यांची मारामार. तीन महिन्यांपूर्वी संपलेल्या पावसाळ्याच्या खुणा अजून त्या खोपटात स्पष्ट दिसताहेत. तरीही म्हातारी म्हणते, राहू दे की सुखानं हितंच...

मी म्हातारीला म्हटलेलं, चल माझ्याबरोबर. शहरात राहू. या गावात काय मिळालंय तुला...? चांगली नोकरी आहे. घरी बायको आहे. पोरं आहेत. मजेत राहशील शहरात.

म्हातारी नाही आली. मनात त्या क्षणी चडफडाट झालेला. हट्टी आहे मुलखाची. आयुष्यात कधी माझं एेकायची नाही.

शहराच्या रक्तात परत मिसळून गेल्यावर दोन दिवस विचार करतोय.

म्हातारीचं बरोबरच तर आहे, असं आता वाटायला लागलंय. तिला तिथं सुख आहे. म्हातारीनं एक बोंब मारली, तर चार घरं धावत येतील इतकी ओळख आहे. जेवायला तोशीस पडू नये, इतकी शेती. खंडानं दिलेली. खंड वेळच्या वेळी येतोय. म्हातारीला काही त्रास नाही. दुखलं-खुपलं तर बघायला कोणी जवळ नाही, ही आपल्याला चिंता. तिला कधी वाटलीय? नाही. दुखलं-खुपलं तरी अंगावरच काढायचं आणि अगदीच काट्याचा नायटा झाला, तर डाग्तराकडं जायचं, ही तिची रित.

खोकल्याची किंचित उबळ मला डॉक्टरकडं पळवते. किंचितसा घाम छातीत धडकी भरवतो. पेपरवाले म्हणतात तो महागाईचा भस्मासूर आमच्या घरात उठता बसता नाचतो. आणखीही खूप काही म्हातारीला जे मिळतं, ते आम्ही इथं गमावतो...

बरोबरच तर आहे म्हातारीचं. पावसाळ्याच्या चार महिन्यातली गळती सोडली, तर तिला सुखच तर आहे. आणि गळतीही चार महिने कुठं असते? जेव्हा पाऊस पडतो तेव्हाच, हे तिचं साधं गणित.

शहरात राहून गणितं चुकलेल्या मला ते कळलं. पण, परत शहरात आल्यावर...मग आज पटलं, म्हातारी खरंच सुखी आहे. तिथं आहे म्हणून. जिथं जन्मली, वाढली, तिथंच माती होण्यात तिचं सुख आहे. ते सुख मी का हिरावून घेऊ?

3 comments:

 1. छान लिहिलंय. आवडलं.

  ReplyDelete
 2. खुप छान लेख लिहिला आहे , गावाकडच्या माणसांची Reality आहे त्यांना शहरात अजिबात करमत नाही , त्यांना गवाकडचे वातावरणच सूट होते , शहरात दिवसभर बसून खूप बोर होते .लेख खुप म्हणजे खुप सुन्दर आणि अप्रतिम लिहिलाय . असेच लेख लिहित जा

  ReplyDelete
 3. गौरी आणि प्रितेश.
  आभारी आहे.

  ReplyDelete