Thursday, February 25, 2010

इंग्रजीतले भारतीय शब्द...

इंग्रजी ही जगाची भाषा आहे. आपण नाकारलं, तरीही तिचं महत्व काही कमी होत नाही. इंग्रजी का वाढली, याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे या भाषेनं तंत्रज्ञान आणि विज्ञान आत्मसात केलं. सामान्यांपर्यंत सामान्यांच्या भाषेत पोहोचवलं. आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे या भाषेनं अन्य भाषांचा दुस्वास न करता त्यांच्यातील शब्द आपल्या भाषेत आणले. लोक बोलतात ती भाषा, हे सूत्र सांभाळले.

हिंदी/उर्दू - बंगला, करोड, डाकू, देवदार, डोंगी (लहान होडकं), दुंगारी (विजार), घी, जिमखाना, जोधपुरी, लाख, लूट, पैसा, पकोडा, राज, सामोसा, शाम्पू, तंदूरी, टमटम, वाला.
मल्याळी - बेटल, कॉयर, कोप्रा, जिंजर, टीक
मराठी - मुंगूस
संस्कृत - आश्रम, अवतार, बनिया, बनियन, बेरील्, ब्राम्हण, कार्माइन, चित्ता, शिन्त्झ, चटणी, क्रिमसन्, जगर्नॉट, जंगल, ज्युट, लॅक्वर, मॅडरीन, पंडित, पालखी, सफायर, सुट्टी, सुगर (शुगर), अहिंसा, आश्रमा, आत्मा, बोधीसत्व, बुद्ध, चक्र, गुरू, हटयोग, कर्म, लिंग, महाराज, महात्मा, मंत्र, माया, निर्वाण, राजा, राणी, सत्याग्रह, सूत्र, स्वस्तिक, यंत्र, योग, योगासन
तमिळ - कॅटामारन्, चिरूट, करी, मॅंगो, मुल्लीगटावनी (mulligatawny), पॅरीह् (pariah)
तेलुगू - बंडिकोट

ही सहज मिळालेली माहिती. कदाचित आणखीही मराठी, संस्कृत शब्द इंग्रजीत रुळलेले असू शकतील. वर दिलेले शब्द ऑक्सफर्डच्या वेबसाईटवरून घेतलेले आहेत. एखादी भाषा कशी विकसित होत जाते, याचं हे उदाहरण मानता येईल. इंग्रजांनी ज्या ज्या देशांवर राज्य केले, तेथील शब्द इंग्रजीत घेतले आहेत.

परवा गुगल बझ् लॉन्च झालं. बझ् हा शब्द अर्थवाही आहेच. गुणगुण हा त्याला पर्यायी शब्द असू शकेल. तो तितकासा लागू होईल का? की बझ् स्विकाराचा?

मराठी वाढवायची असेल, तर प्रत्येक मराठी शब्दाला पर्यायी शब्द तयार करण्यात वेळ घालवायचा, की शब्दांचे मराठीकरण करून ते वापरायचे, हा निर्णय आपल्या हातात आहे.

(चपाती हा शब्दही ऑक्सफर्डमध्ये आहे. पण, वेबसाईटवरील माहितीत त्याचा समावेश झालेला नाही. म्हणून तो घेतलेला नाही.)

2 comments:

 1. कोणत्याही भाषेत एका विशिष्ट काळात, इतर भाषेतले पाच ते दहा ट्क्के शब्द रूळले जातात, तोपर्यंत ते त्या भाषेसाठी स्वीकारार्ह ठरते. पण परकीय भाषेतल्या शब्दांचे प्रमाण अति झाले, तर ते त्या मूळ भाषेला मारक ठरून ती भाषा मृतवत होण्याचा धोका असतो. अश्या ठिकाणी मूळ भाषा नष्ट होऊन, मूळ भाषेतले पाच दहा ट्क्के शब्द अधिक परक्या भाषेतले उरलेल्या शब्दांनी समृद्ध झालेली "पिजन लॅंग्वेज" निर्माण होते.

  इथे मराठीमध्ये इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द सुचवण्याची क्षमता पुरेपुर आहे, पण आपलीच उदासीनता मराठीच्या विकासाला घातक ठरत आहे. मराठी प्रतिशब्द वापरायचे याचा अर्थ असा होत नाही, की प्रत्येक इंग्रजी शब्दाला किंवा परकीय शब्दाला प्रतिशब्द शोधायचा. "सुशी, एस्किमो, शार्क, रेनडिअर " इत्यादि शब्दांना आपण प्रतिशब्द देऊ शकत नाही. असे शब्द जसेच्या तसे वापरले जातील. पण ज्या शब्दांना आपण सहजपणे प्रतिशब्द देऊ शकतो, अशा ठिकाणी आपण मराठी शब्दांचा जरुर वापर केला पहिजे. नाहीतर सध्या मराठीत होणारा इंग्रजी शब्दांचा सुळसुळाट पाहता, काही दिवसांनी फ़क्त कर्ता आणि क्रियापद मराठीतले आणि उरलेले शब्द इंग्रजीतले वापरलेले असतील, अशाच प्रकारची वाक्ये वाचावी लागतील, आणि मूळ मराठी भाषा नष्ट होऊन तिथे नवीनच "पिजन लॅंग्वेज" तयार झालेली असेल.

  यापैकी कोणता पर्याय स्वीकारायचा ते आपणच ठरवायचे आहे.

  ReplyDelete
 2. डी. डी. : आपले म्हणणे मान्य. प्रतिशब्द हवेत; अट्टाहास नको इतकंच माझं म्हणणं.
  मी अट्टाहास नको हा पर्याय स्विकारलाय.
  प्रतिशब्द नकोतच, हा स्विकारलेला नाहीय.

  पण, छान वाटलं. तुमची सखोल प्रतिक्रिया वाचून.

  ReplyDelete